अष्टपैलू सॅम करन आणि अनुभवी इम्रान ताहीर यांनी मैदानात तग धरत मुंबईच्या गोलंदाजांचा धीराने सामना केल्यामुळे शारजाच्या मैदानावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने आपली लाज राखली आहे. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर यांच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईच्या डावाची घसरगुंडी झाली होती. पॉवरप्लेमध्ये निम्मा संघ गमावलेल्या चेन्नईची अवस्था एका क्षणाला ७ बाद ४३ इतकी बिकट झाली होती.

एका क्षणाला चेन्नईचा संघ १०० धावसंख्येचा टप्पा ओलांडतो की नाही असं वाटत असतानाच सॅम करनने एक बाजू लावून धरत चेन्नईचं आव्हान कायम राखलं. एकेरी-दुहेरी धाव घेत सॅमने धावफलक हलता ठेवला. शार्दुल ठाकूर माघारी परतल्यानंतर करनने इम्रान ताहीरसोबत ४३ धावांची भागीदारी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. आयपीएलच्या इतिहासात ९ व्या विकेटसाठी झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे याआधीच्या दोन्ही भागीदाऱ्या या चेन्नईच्याच फलंदाजांनी मुंबईविरुद्ध सामन्यात केल्या आहेत.

दरम्यान, मुंबईच्या गोलंदाजांचा धीराने सामना करताना सॅम करनने आपलं अर्धशतकही साजरं केलं. ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह करनने ५२ धावांची खेळी केली. सामन्यात ट्रेंट बोल्ट टाकत असलेल्या अखेरच्या षटकात करन त्रिफळाचीत झाला.