मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पुन्हा एकदा किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. नाणेफेक जिंकत पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात या सामन्यातही खराब झाली. सलामीवीर क्विंटन डी-कॉक शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता बाद झाला. यानंतर मैदानावर आलेला सूर्यकुमार यादवही चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

दरम्यान किशन गौतमच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर रोहितने पोलार्डच्या साथीने फटकेबाजीला सुरुवात केली. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत अर्धशतक झळकावलं. रोहित अर्धशतक झळकावत असताना त्याची मुलगी समायराही आपल्या आईसोबत टिव्हीवर सामना पाहत आपल्या बाबांना प्रोत्साहन देत होती. मुंबई इंडियन्सने समायराचा फोटो ट्विट केला आहे.

रोहितने ४५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७० धावा केल्या. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवक उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित सीमारेषेवर झेलबाद झाला.

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘हिटमॅन’ने करुन दाखवलं ! आयपीएलमध्ये ओलांडला ५ हजार धावांचा टप्पा