डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने पंजाबविरुद्ध सामन्यात २०१ धावांपर्यंत मजल मारली आहे. वॉर्नर आणि बेअरस्टो जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत दुबईच्या मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. दोन्ही खेळाडूंनी या सामन्यात आपली अर्धशतकं साजरी केली. जॉनी बेअरस्टोचं शतक ३ धावांनी हुकलं तर कर्णधार वॉर्नरने ५२ धावा केल्या.

आपल्या अर्धशतकी खेळीच्या दरम्यान डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची वॉर्नरची ही ५० वी वेळ होती. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.

रवी बिश्नोईने एकाच षटकात वॉर्नर आणि बेअरस्टोला माघारी धाडत पंजाबला एकाच षटकात दोन महत्वाचे बळी मिळवून दिले. दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर हैदराबादच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतले फलंदाज अपेक्षित फटकेबाजी करु शकले नाही. अखेरीस विल्यमसनने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत हैदराबादला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.