28 October 2020

News Flash

IPL 2020 : शिखरच्या शतकामुळे दिल्ली कॅपिटल्सचा विजय, रंगतदार सामन्यात चेन्नई पराभूत

चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेत नाबाद १०१ धावांची खेळी

फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार लगावत दिल्लीला सामन्यात विजय मिळवून दिला. शिखर धवनने या सामन्यात नाबाद १०१ धावांची खेळी केली.

१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ दिपक चहरच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनची चांगली जोडी जमली. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. दरम्यानच्या काळात शिखरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. श्रेयस अय्यर एक बाजू लावून धरत असताना शिखरने शारजाच्या मैदानात काही सुरेख फटके खेळले.

ड्वेन ब्राव्होने अय्यरला माघारी धाडत दिल्लीला तिसरा धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेल्या अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसनेही चांगली फटकेबाजी करत शिखर धवनला साथ दिली. या काळात चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी शिखर धवनचे काही सोपे झेल टाकले. धवन-स्टॉयनिस जोडी दिल्लीला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने त्याला माघारी धाडलं. स्टॉयनिसने २४ धावा केल्या. यानंतर यष्टीरक्षक कॅरीही फारशी चमक न दाखवता सॅम करनच्या गोलंदाजीवर बाद झाला. शिखर धवनने मात्र अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना केला. सॅम करनच्या १९ व्या षटकात धवनने आयपीएल कारकिर्दीतलं आपलं पहिलं शतक झळकावलं. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकारांची आतिषबाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नईकडून दीपक चहरने २ तर सॅम करन, शार्दुल ठाकूर आणि ड्वेन ब्राव्हा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, फाफ डु-प्लेसिस, अंबाती रायुडू यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने दिल्लीविरुद्ध सामन्यात १७९ धावांचा पल्ला गाठला आहे. शारजाच्या मैदानावर नाणेफेक जिंकत धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही चेन्नईच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत मैदानावर तळ ठोकत दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना केला. फाफ डु-प्लेसिसने झळकावलेलं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत रायुडूने केलेली फटकेबाजी चेन्नईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. अंबाती रायुडूने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत २५ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या. रविंद्र जाडेजानेही त्याला उत्तम साथ दिली.

नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडत चेन्नईला मोठा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि सॅम करन या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर आपले पाय स्थिरावल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. डु-प्लेसिसने आक्रमक पवित्रा घेत चांगली फलंदाजी करत दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. अखेरीस नॉर्जने वॉटसनचा त्रिफळा उडवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं. दरम्यानच्या काळात डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डु-प्लेसिसने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.

कगिसो रबाडाने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. मोक्याच्या क्षणी चेन्नईने दोन्ही स्थिरावलेले फलंदाज माघारी परतल्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मैदानावर आलेल्या धोनी आणि रायुडू जोडीने फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याचं आव्हान स्विकारलं. मात्र नॉर्जच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी स्वस्तात माघारी परतला. मात्र अंबाती रायुडूने रविंद्र जाडेजाच्या सोबतीने फटकेबाजी करुन चेन्नईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीकडून नॉर्जने २ तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:14 pm

Web Title: ipl 2020 dc beat csk by 5 wickets shikhar dhawan maiden century psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: विराटचा सीमारेषेवर तेवातियाने घेतला भन्नाट झेल
2 IPL च्या या लोगोचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?? सेहवागने दिलं उत्तर…
3 IPL 2020 : संधी मिळाली तर तेवतिया करोनावर लस देखील बनवेल – सेहवाग
Just Now!
X