दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वॉर्नर-साहा जोडीने केलेली झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारली होती. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. राशिद खानने ७ धावांत ३ बळी पटकावले. हैदराबादने या विजयासह आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवत गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले.
राशिद खानची प्रभावी फिरकी…
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा जोडीने तुफान फटकेबाजी करत पॉवरप्लेमधील यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या गाठली. ‘बर्थडे बॉय’ डेव्हिड वॉर्नरने पॉवर-प्लेमध्येच आपले अर्धशतक पूर्ण केले. तो ३४ चेंडूत ६६ धावा करून माघारी परतला. वृद्धिमान साहाने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. त्याने ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. त्यानंतर मनिष पांडे आणि केन विल्यमसन जोडीने शेवटपर्यंत खिंड लढवली. मनिष पांडेने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या. या दोघांनी संघाला २० षटकात २१९ धावांपर्यंत मजल मारून दिली.
वृद्धिमान साहाची ८७ धावांची खेळी…
—
‘बर्थडे बॉय’वॉर्नरचं धडाकेबाज अर्धशतक…
२२० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. शिखर धवन शून्यावर माघारी परतला. धावगतीचा विचार करता फलंदाजीत बढती मिळालेला मार्कस स्टॉयनीसदेखील ५ धावा काढून बाद झाला. शिमरॉन हेटमायर-अजिंक्य रहाणे जोडीने थोडी फटकेबाजी केली, पण रहाणे २६ तर हेटमायर १६ धावांवर तंबूत परतला. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील ७ धावा काढून माघारी परतला. पाठोपाठ अक्षर पटेल (१) आणि कगिसो रबाडाही (३) बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ संघर्ष केला, पण त्याला ३६ धावा काढून माघारी परतावे लागले. त्यानंतर तुषार देशपांडेने थोडी फटकेबाजी केली, पण दिल्लीचा डाव १३१ धावांवर आटोपला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 11:00 pm