स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करुन गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सची गाडी गेल्या काही सामन्यांपासून विजयाचा रस्ता हरवून बसलेली आहे. लागोपाठ ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर दिल्लीच्या संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. शनिवारी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. सोमवारी दिल्लीचा अखेरचा सामना RCB विरुद्घ रंगणार आहे. दिल्लीच्या संघाची सध्याची परिस्थिती पाहता सलामीच्या फळीतल्या फलंदाजांनी खेळ सुधारला नाही तर दिल्ली प्ले-ऑफमधलं आपलं स्थान गमावून बसेल अशी भीती श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईकर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल

“मला अचानक दिल्लीच्या फलंदाजीची चिंता वाटायला लागली आहे. गेल्या काही सामन्यांपासून त्यांचे फलंदाज म्हणावी तशी चांगली कामगिरी करत नाहीयेत. संपूर्ण संघ सलामीच्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून असल्यासारखा वाटतो. इतर कोणतेही फलंदाज झटपट धावा जमवू शकत नाहीयेत. त्यामुळे ते कदाचीत चौथं स्थान पटकावू शकतात, पण मी त्यांच्याबद्दल खात्री देऊ शकत नाही.” कुमार संगकारा Star Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : आमच्या खेळात अनेक त्रुटी होत्या – कर्णधार श्रेयस अय्यरकडून कबुली

तेराव्या हंगामात साखळी फेरीचा अखेरचा टप्पा आला तरीही मुंबई इंडियन्सचा अपवाद वगळता इतर कोणतेही संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होऊ शकले नाहीत. पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे यांचा हरवून बसलेला फॉर्म दिल्लीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईविरुद्ध सामन्यात दिल्लीने अजिंक्य रहाणेला बाहेर करत पृथ्वी शॉला संधी दिली. परंतू पृथ्वी या सामन्यातही अपयशी ठरला. दिल्लीचा पुढचा सामना रविवारी RCB विरुद्ध असणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी संघात काही बदल करणार का असं विचारलं असता श्रेयस अय्यरने त्याबद्दल विचार करावा लागेल असे सूचक संकेत दिले आहेत. त्यामुळे दिल्लीचा संघ प्ले-ऑफचं स्थान मिळवतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.