सलामीच्या सामन्याआधी चेन्नई सुपरकिंग्जला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यामुळे क्वारंटाइन झालेल्या दिपक चहरला बीसीसीआयने पुन्हा सराव करण्याची परवानगी दिली आहे. दिपकने करोनावर मात केली असून त्याच्या सर्व टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. शुक्रवारपासूनच चहर सराव करु शकणार आहे. करोनाची लागण झाल्यानंतर खेळाडूंना उपचारासाठी क्वारंटाइन करण्यात आलं होतं. यावर मात केल्यानंतर नियमानुसार सराव सुरु करण्याआधी खेळाडूंना बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते.

“दिपक आजपासून सुरुवात करेल, त्याला बीसीसीआयची परवानगी मिळाली आहे. संपूर्ण संघ कसून सराव करत आहे, पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” CSK चे CEO काशी विश्वनाथन यांनी पीटीआयला माहिती दिली. २०१९ साली झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईला मुंबईकडून एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान दीपक चहरसोबतच पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या ऋतुराज गायकवाडची शनिवारी चाचणी होणार असून त्याच्या ट्रेनिंगबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.

अवश्य वाचा – Video : सरावादरम्यान धोनीने मारलेला सिक्स थेट मैदानाबाहेर, मुरली विजयही झाला अवाक