गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून आश्वासक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना ठराविक अंतराने धक्के देणं सुरु ठेवलं. राजस्थानकडून बेन स्टोक्सने एकाकी झुंज दिली, परंतू दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्याचीही डाळ शिजू शकली नाही. राहुल तेवतियाने अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून रंगत निर्माण केली. परंतू तुषार देशपांडेने भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही.

विजयासाठी मिळालेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाने आश्वासक आणि सावध सुरुवात केली. सलामीवीर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाज चांगली फटकेबाजी करत असतानाच नॉर्जने जोस बटलरचा त्रिफळा उडवत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथही रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. काही क्षणांत दोन फलंदाज माघारी परतल्यामुळे राजस्थानचा संघ अडचणीत आला. परंतू बेन स्टोक्सने संजू सॅमसनच्या साथीने संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाचं आव्हान कायम राखलं.

बेन स्टोक्सने दिल्लीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत ३५ चेंडूत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. तुषार देशपांडेने बेन स्टोक्सला बाद करत दिल्लीला महत्वाची विकेट मिळवून दिली. स्टोक्सने ४१ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनही अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. हैदराबादविरुद्ध सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेला रियान परागही रॉबिन उथप्पासोबत एकेरी धाव घेताना झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. मधल्या फळीत रॉबिन उथप्पा आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू नॉर्जने उथप्पाचा त्रिफळा उडवत दिल्लीला पुन्हा एक यश मिळवून दिलं. १९ व्या षटकात जोफ्रा आर्चरही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणेकडे झेल देऊन बाद झाला, रबाडाने त्याचा बळी घेतला. दिल्लीकडून अॅन्रित नॉर्ज आणि तुषार देशपांडेने २ तर कगिसो रबाडा, आश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात १६१ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून प्रभावी मारा करत दिल्लीसमोर अडचणी निर्माण केल्या. अखेरीस अय्यर-धवनने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र मोक्याच्या क्षणी दोन्ही फलंदाज माघारी परतल्यामुळे दिल्ली १६१ धावांपर्यंतच मजल मारु शकली.

दिल्लीच्या डावाची सुरुवातच खराब झाली. जोफ्रा आर्चरचा टप्पा पडून आत येणारा चेंडू पृथ्वी शॉला समजायच्या आतच बेल्स उडाल्या होत्या. पहिल्याच चेंडूवर महत्वाचा फलंदाज माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला डाव सावरण्याची संधी होती. मात्र आर्चरच्या गोलंदाजीवर रहाणेने खराब फटका खेळत आपली विकेट फेकली, तो २ धावा काढत बाद झाला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शिखरने एक बाजू लावून धरत राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्यानंतर शिखर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.

दुसऱ्या बाजूने श्रेयस अय्यरही अर्धशतक झळकावत कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर आर्चरकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजस्थानच्या गोलंदाजांसमोर त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ३, जयदेव उनाडकटने २ तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १-१ बळी घेतला.