इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) शानदार सुरुवात करत दिल्ली कॅ पिटल्सने सलग दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी सातत्य कायम राखण्याचे ध्येय दिल्ली कॅपिटल्सने बाळगले आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने ‘सुपर-ओव्हर’पर्यंत रंगलेल्या सलामीच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान परतवून लावले. त्यानंतर चेन्नई सुपर किं ग्जचा सहज पाडाव करत दिल्ली कॅ पिटल्सने गुणतालिके त अग्रस्थानी झेप घेतली. दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादला अद्याप एकाही विजयाची नोंद करता आलेली नाही. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादने आपले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे पहिल्या विजयासाठी ते आतूर आहेत.

दिल्लीच्या फलंदाजीची मदार सलामीवीर शिखर धवनवर असून त्याच्या सोबतीला पृथ्वी शॉ दमदार कामगिरी करत आहे. धवन-शॉ जोडी दिल्लीला चांगली सुरुवात करून देत असल्यामुळे मधल्या फळीवर फारसे दडपण येत नाही. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही उपयुक्त खेळी करत दिल्लीच्या विजयात योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे तसेच शिम्रॉन हेटमेयरच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली असल्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा, ऑनरिख नॉर्किआ तसेच फिरकीपटू अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.

सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी दमदार कामगिरी करूनही मधल्या फळीच्या अपयशामुळे हैदराबादला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवता आला नाही. वृद्धिमन साहा अपयशी ठरत असून त्याच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा हैदराबादला असेल. त्यांना मात्र वॉर्नर आणि बेअरस्टो यांच्यावरच अवलंबून राहणे महागात पडत आहे. मिचेल मार्शच्या जागी निवड झालेल्या मोहम्मद नबीने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. हैदराबादला आता केन विल्यम्सनला संधी देण्याबाबत विचार करावा लागणार आहे. गोलंदाजीत फिरकीपटू रशिद खानकडून मोठय़ा अपेक्षा असून अन्य गोलंदाजांनाही आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १