कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या खराब कामगिरीचं सत्र सुरुच आहे. टी-२० कारकिर्दीतला ३०० वा सामना खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला शून्यावर माघारी परतावं लागलं आहे. तेराव्या हंगामात प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी कोलकात्याला पंजाबविरुद्ध सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. शारजाच्या मैदानावरील सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये KKR च्या फलंदाजांना माघारी धाडत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली.

मोहम्मद शमीने डावातलं दुसरं षटक टाकताना राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक यांना मागे धाडलं. शमीच्या गोलंदाजीवर चेंडू दिनेश कार्तिकच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक राहुलच्या हातात गेला. पंचांनी दिलेल्या निर्णयाविरोधात दिनेश कार्तिकने DRS चा निर्णय घेतला, परंतू तिसऱ्या पंचांच्या पाहणीतही कार्तिक बाद असल्याचं समोर आलं. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कार्तिकला स्थान मिळालं आहे.

नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिक हे फलंदाज माघारी परतल्यानंतर शुबमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी फटकेबाजी करुन संघाचा डाव सावरला.