आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघात महत्वाचा बदल झालेला आहे. कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी कर्णधारपदाची जबाबदारीतून स्वतःला मोकळं करण्याची विनंती संघ प्रशासनाला केली होती. KKR च्या प्रशासनाने ही विनंती मान्य करत संघाचं नेतृत्व इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गनकडे सोपवलं आहे. KKR ने याबद्दल परिपत्रक काढत माहिती दिली आहे.

“दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूने आतापर्यंत कोलकात्याचं नेतृत्व केलं यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. आपला खेळ हवा तसा होत नसल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यासाठी मोठं मन लागतं. दिनेशने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला थोडा धक्का बसला, परंतू त्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतू संघात मॉर्गनसारखा अनुभवी खेळाडू असल्यामुळे यापुढे तो KKR चं नेतृत्व करेल. दिनेश आणि मॉर्गन यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्येही हे दोन्ही खेळाडू अशीच कामगिरी करत राहतील असा आम्हाला विश्वास आहे.” KKR चे सीईओ वेंकी मैसूर यांनी माहिती दिली.

फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कार्तिकने घेतला निर्णय

 

आयपीएलच्या तेराव्या हंगामात कोलकात्याचा संघ सध्या ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आज KKR चा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. त्यामुळे नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली या सामन्यात KKR चा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.