शारजा क्रिकेट स्टेडियमवर चाहत्यांना पुन्हा एकदा षटकारोत्सव पाहायला मिळण्याची शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार असून दोन्ही संघांत धडाकेबाज फलंदाजांचा भरणा असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शारजामध्ये आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत २०० धावांचा टप्पा सहज पार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे कोलकाताचा आंद्रे रसेल, इऑन मॉर्गन, सुनील नरिन या खेळपट्टीचा पुरेपूर लाभ उचलण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या लढतीत शुभमन गिलने केलेली उत्तम सुरुवात आणि त्यानंतर शिवम मावी-कमलेश नागरकोटी या युवकांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर कोलकाताने राजस्थानचा विजयरथ रोखला. त्यामुळे दिल्लीविरुद्धही ते कामगिरीत सातत्य राखतील, अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय वरुण चक्रवर्ती फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवण्यात आतापर्यंत यशस्वी झाला आहे.
दुसरीकडे सुरुवातीचे दोन सामने जिंकून स्पर्धेला धडाक्यात प्रारंभ करणाऱ्या दिल्लीला मागील लढतीत सनरायजर्स हैदराबादने सहज नमवले. दिल्लीच्या मधल्या फळीला कामगिरी उंचावण्याची आवश्यकता असून कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अनेक यष्टीरक्षक फलंदाज छाप पाडताना दिसत आहेत. त्यामुळे शनिवारी शारजावर पंतची बॅट तळपल्यास आश्चर्य वाटायला नको. शिखर धवन आणि शिम्रॉन हेटमायर यांना अद्याप सूर गवसलेला नसल्याने अजिंक्य रहाणेला संघ व्यवस्थापन सलामी अथवा मधल्या फळीत संधी देऊ शकते.
गोलंदाजीत कॅगिसो रबाडा आणि आनरिख नॉर्किया यांची दक्षिण आफ्रिकन वेगवान जोडी दिल्लीसाठी सातत्याने बळी मिळवत आहेत. रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत अमित मिश्राही प्रभावी कामगिरी करत आहे. त्यामुळे दिल्लीचा संघ कोलकाताला नमवून पुन्हा विजयी पथावर परतण्यासाठी उत्सुक आहे.
* सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट
२३ दिल्ली आणि कोलकाता यांच्यात २३ सामने झाले असून कोलकाताने १३, तर दिल्लीने ११ सामन्यांत विजय मिळवला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 3, 2020 12:12 am