रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने तेराव्या हंगामाच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे. विजयासाठी मिळालेलं १५७ धावांचं आव्हान मुंबईने कर्णधार रोहित शर्मा आणि इतर फलंदाजांच्या फटकेबाजीच्या जोरावर सहज पूर्ण केलं.

धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ही जोडी मैदानावर स्थिरावली होती. आश्विनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात गोंधळ निर्माण झाला. रोहित नॉन स्ट्राईक एंडवर पोहचून सूर्यकुमार धावेसाठी तयार नव्हता. पण आपल्या कर्णधाराची विकेट जाईल यासाठी सूर्यकुमारने मोठं मन करत स्वतःची विकेट फेकली.

काय घडलं मैदानात वाचा सविस्तर बातमी – Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा

सामना संपल्यानंतर सूर्यकुमारला याबद्दल विचारण्यात आलं. पण यावेळीही सूर्यकुमारने आपण विजयात आनंदी असून संघासाठी असं बलिदान द्यावं लागलं तरीही हरकत नसल्याचं सांगितलं.

मुंबईकडून रोहित शर्माव्यतिरीक्त इशान किशनने नाबाद ३३ धावा करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले.