आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या हंगामात चांगल्याच फॉर्मात आहे. तर दुसऱ्या बाजूला पहिल्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवणारा दिल्लीचा संघही जय्यत तयारी करुन सज्ज झाला आहे. GloFans Cric Data Metrics या संस्थेने केलेल्या विश्लेषणानुसार अंतिम सामन्यात मुंबईचं पारडं जड आहे.

दिल्लीकडून फलंदाजीत शिखर धवनने यंदा चांगली कामगिरी केली आहे. शिखरला आव्हान देईल असा एकही फलंदाज मुंबईच्या आघाडीच्या फळीत नाही. परंतू मुंबई इंडियन्सची मधली फळी ही दिल्लीच्या मधल्या फळीपेक्षा अधिक मजबूत आहे. शिखरने यंदाच्या हंगामात ६०० धावांचा टप्पा ओलांडला आहे, परंतू दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या एकाही फलंदाजाला ५०० धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. परंतू मुंबईचे सुरुवातीचे तीन फलंदाज फॉर्मात आल्यास ते दिल्लीला नक्कीच भारी पडू शकतात.

फोटो सौजन्य – GloFans Cric Data Metrics

 

दुबईच्या मैदानावर गोलंदाजांची कामगिरी ही चांगली राहिलेली आहे. विशेषकरुन जलदगती गोलंदाजांना विकेट मिळवण्यात फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीयेत. पण फिरकीपटूंना विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दिल्लीकडून नॉर्ज, रबाडा, स्टॉयनिस तर मुंबईकडून बोल्ट आणि बुमराह यांनी आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. सामन्यावर पकड घेण्यासाठी दोन्ही संघातील जलदगती गोलंदाजांना बहारदार कामगिरी करावी लागणार आहे.

दिल्ली आणि मुंबई यांच्यातील आकडेवारीत फारसा फरक नसला तरीही स्पर्धेतला आतापर्यंतचा फॉर्म पाहता मुंबई इंडियन्सचं पारडं हे नक्कीच जड मानलं जातंय. त्यामुळे दिल्ली यंदा आपलं पहिलं विजेतेपद मिळवणार की मुंबई सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून विक्रम रचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुबईच्या मैदानावरची आकडेवारी काय सांगते??

  • मुंबई इंडियन्स – ७ सामने खेळले, २ विजय – ५ पराभव
  • दिल्ली कॅपिटल्स – १० सामने खेळले, ५ विजय – ५ पराभव
  • आतापर्यंतचा इतिहास – २७ वेळा दोन्ही संघ समोरासमोर, मुंबई १५ वेळा तर दिल्ली १२ वेळा विजयी

अवश्य वाचा – IPL 2020 : ‘हा’ योगायोग जुळून आला तर दिल्ली जिंकू शकते आजचा सामना