भारतीय क्रिकेटपटू असो किंवा परदेशी प्रत्येकाला एकदातरी आयपीएल मध्ये खेळायचं असतं. गेल्या १२ वर्षांमध्ये आयपीएलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आतापर्यंत या स्पर्धेने भारताच्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांना संधी दिली. आयपीएलच्या माध्यमातून अनेकांनी भारतीय क्रिकेट संघातही जागा मिळवली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात कल्याणच्या तुषार देशपांडेने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होत आहे. दुबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हर्षल पटेलला विश्रांती देत मुंबईच्या तुषार देशपांडेला संघात स्थान दिलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तुषार देशपांडेची कहाणीही तितकीच चांगली आहे.

मुळचा कल्याणचा रहिवासी असलेला तुषार देशपांडे स्थानिक क्लबमध्ये नियमीत सरावाला जायचा. सुरुवातीपासूनच चांगला फलंदाज होण्याचं स्वप्न पाहिलेल्या तुषार देशपांडे नंतरच्या काळात गोलंदाज झाला. २००७ साली MCA च्या १३ वर्षाखालील मुलांच्या संघाची निवड शिवाजी पार्क मैदानावर होणार होती. यावेळी ट्रायलसाठी मैदानावर आलेल्या तुषारला फलंदाजीसाठी त्याच्यासारखेच ६०-७० खेळाडू रांगेत दिसले. दुसरीकडे गोलंदाजीच्या रांगेत कमी खेळाडू असल्यामुळे तुषारने गोलंदाजीच्या रांगेत उभं रहायचं ठरवलं. महत्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी गोलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूंमध्ये तुषार देशपांडेने आश्वासक मारा करत निवड समितीच्या सदस्यांचं लक्ष वेधलं आणि इथूनच तुषारसाठी मुंबई संघाची दारं खुली झाली.

तुषारचे आई-वडिल सरकारी कर्मचारी असले…पण दरदिवशी सरावासाठी कल्याण ते शिवाजी पार्क असा प्रवास करताना आपल्या मुलाला कसलाही त्रास होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. २०१६-१७ साली तुषारने मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. २०१८-१९ च्या विजय हजारे करंडक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत तुषारने ५ बळी घेत मुंबईला एकहाती सामना जिंकवून दिला होता. तुषारने भारताचा माजी सलामीवीर आणि दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरचा घेतलेला बळी हा चर्चेचा विषय बनला होता. उत्तम वेग आणि यॉर्कर आणि चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्यासाठी तुषार देशपांडे ओळखला जातो. विजय हजारे करंडक गाजवल्यानंतर अवघ्या एका वर्षात तुषार दुलिप करंडकासाठी इंडिया ब्ल्यू संघात निवडला गेला. तेराव्या हंगामासाठी दिल्लीने तुषारवर २० लाखांची बोली लावत त्याला संघात स्थान दिलं. रणजी क्रिकेटमध्ये ५० बळी घेतलेला तुषार आता आयपीएलमध्ये काय कमाल दाखवतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.