इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाचा प्रारंभ होऊन दोन आठवडे उलटले तरीही रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत कोहलीच्या कामगिरीकडेच चाहत्यांचे खास लक्ष असेल, यात शंका नाही.

या आठवडय़ापासून दर शनिवार-रविवारी प्रत्येकी दोन सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे दुपारच्या सामन्यातून दवाचा घटक पूर्णपणे नाहीसा झालेला असेल. अबू धाबीत दोन्ही संघांची ही पहिलीच लढत होत असून दोघांच्याही खात्यात सध्या प्रत्येकी तीन सामन्यांतून दोन विजयांचे चार गुण जमा आहेत. गेल्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सुपर-ओव्हरमध्ये नमवल्यामुळे बेंगळूरुच्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर दुसरीकडे स्पर्धेची सुरुवात सलग दोन विजयांसह करणाऱ्या राजस्थानला गेल्या सामन्यांत कोलकाता नाइट रायडर्सने धूळ चारली.

देवदत्त पडिक्कल आणि आरोन फिंच यांची सलामी जोडी बेंगळूरुसाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. परंतु भरवशाचा कोहली (तीन सामन्यांत १८ धावा) मात्र सपशेल अपयशी ठरला आहे. त्यामुळेच एबी डीव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांच्यावरील दबाव वाढत आहे. क्षेत्ररक्षणादरम्यानही कोहलीच्या नेतृत्वातील उणिवा दिसून येत आहेत. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या लढतीत कोहली टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी उत्सुक असेल.

स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थानकडे स्फोटक फलंदाजांचा भरणा आहे. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि टॉम करन या इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांवर राजस्थानची भिस्त आहे. मात्र अंकित राजपूत आणि जयदेव उनादकट यांना धावा रोखण्यात अपयश येत आहे. त्याशिवाय श्रेयस गोपाळला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मयांक मरकडेयला राजस्थान संधी देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

*  वेळ : दुपारी ३.३०वा

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या