आयपीएलचा १३ वा हंगाम सध्या उतरार्धाकडे झुकला आहे. अंतिम चारमध्ये पोहचण्यासाठी संघामध्ये सध्या चुरस निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात हैदराबाद संघानं राजस्थानचा पराभव केला. या सामन्यात मनिष पांडेनं एकहाती विजय मिळवून दिला. राजस्थान संघाकडून बेन स्टोक्स पुन्हा एकदा अपयश ठरला आहे. राजस्थान रॉयल्सनं इंग्लंडच्या या धाकड अष्टपैलू खेळाडूला तब्बल १२ कोटी ५० लाख रुपयांना विकत घेतलं होतं. पण स्टोक्सला आतापर्यंत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

स्टोक्सनं आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत १०३ चेंडू खेळून काढले आहेत.मात्र अद्याप एकही षटकार त्याला लगावता आला नाही. १३ व्या हंगामात स्टोक्स आतापर्यंत पाच सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी आला आहे. पाच सामन्यात अवघ्या २२ च्या सरासरीनं आणि १०६.७ च्या स्ट्राइक रेटनं फक्त ११० धावा काढल्या आहेत. यामध्ये १४ चौकारांचा समावेश असला तरी एकही षटकार नाही. स्टोक्सनं आयपीएलमध्ये १०० पेक्षा जास्त चेंडूचा सामना करुनही षटकार लगावला नाही. त्यामुळे त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.


नकोसा विक्रम करणारा स्टोक्स आयपीएलमधील पहिलाच खेळाडू नाही. या यादीत भारताचा मनदीप पहिल्या क्रमांकावर आहे. २०१३ मध्ये मनदीपला २२३ चेंडू खेळून एकही षटकार लगवता आला नाही. मनदीपशिवाय हनुमा विहारी (१४३ चेंडू), व्हीव्हीएस लक्ष्मण(१३४ चेंडू), , चेतेश्वर पुजारा(१२४), केन विल्यम्सन(११३) आणि कुमार संगाकारा(१०५) यांसारख्या दिग्गज खेळाडूंचेही नाव आहे.