मुंबई इंडियन्सचा महत्वाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने अखेरीस आपल्या आयपीएल कारकिर्दीत महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. अबु धाबीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या बळींचं शतक पूर्ण केलं आहे. RCB चा कर्णधार विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवत बुमराहने आपला १०० वा बळी टिपला. १४ चेंडूत ९ धावा काढून विराट बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सौरभ तिवारीकडे झेल देऊन माघारी परतला. यात जुळून आलेला योगायोग म्हणजे बुमराहचा आयपीएल कारकिर्दीतला पहिला आणि शंभरावा बळी विराट कोहलीच ठरला आहे.

दरम्यान सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईकडून कायरन पोलार्डने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा पोलार्डचा निर्णय काहीसा फसला. जोशवा फिलीपे आणि देवदत पडीकल यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. अखेरीस राहुल चहरच्या गोलंदाजीवर फिलीपे यष्टीचीत होऊन माघारी परतला. दुसऱ्या बाजूने पडीकलने आपलं अर्धशतक साजर केलं. यानंतर मैदानावर आलेला विराट कोहलीही फारशी चमक दाखवू शकला नाही.

अवश्य वाचा – जेवलीस का?? मैदानावर असतानाही गरोदर अनुष्काची विराट घेतोय काळजी, हा व्हिडीओ जरुर पाहा…