दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडासाठी यंदाचा आयपीएल हंगाम अतिशय चांगला जातो आहे. आतापर्यंत सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या रबाडाने शारजाच्या मैदानावर चेन्नईविरुद्ध सामन्यात आणखी एक अनोखा विक्रम केला आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यात रबाडाने आपल्या आयपीएल कारकिर्दीतला ५० वा बळी टीपला. रबाडाने चेन्नईचा अर्धशतकवीर फाफ डु-प्लेसिसला माघारी धाडलं.

महत्वाची गोष्ट म्हणजे रबाडाने केवळ २७ सामन्यांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रबाडा आता पहिल्या स्थानी पोहचला आहे. सुनील नारायणने ३२ तर लसिथ मलिंगाने ३३ सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली होती.

गेल्या काही सामन्यांपासून कगिसो रबाडाने आपल्या प्रत्येक सामन्यात किमान १ बळी घेतलेला आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. परंतू अखेरच्या षटकांत फाफ डु-प्लेसिस आणि अंबाती रायुडूने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने १७९ धावांचा पल्ला गाठला.