IPL 2020मध्ये समलोचन समितीत (कॉमेंट्री पॅनेल) कार्यरत असणारा इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन याने पॅनेलमधून तत्काळ प्रभावाने माघार घेतली. पीटरसनने स्पर्धा सुरू होण्याआधी हंगामाच्या मध्यात मायदेशी परतणार असल्याचे सांगितलं होतं. त्यानुसार पीटरसनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. कौटुंबिक कारणामुळे त्याने या कार्यातून माघार घेतली.

“मी IPLच्या समालोचन समितीतून माघार घेत आहे. माझ्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हे वर्ष खूपच विचित्र पार पडलं आहे. सध्या माझी मुलं शाळा चालू नसल्याने घरीच आहेत. मला त्यांच्यासोबत घरी छान वेळ घालवायचा आहे. रोज पूर्ण दिवसभर मला त्यांच्यासोबत मजा मस्ती करायची आहे”, असे ट्विट पीटरसनने केलं आहे.

केविन पीटरसन हा IPL 2020च्या कॉमेंट्री पॅनेलमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू डॅनी मॉरिसन याच्यासोबत पीटरसनदेखील समालोचन समितीतील एक विशेष प्रतिनिधी आहे. परंतु कौटुंबिक कारणामुळे त्याने IPL 2020मधून माघार घेतली आहे.

जागतिक समालोचन समिती: हर्षा भोगले, सायमन डूल, इयन बिशप, मायकल स्लेटर, डॅनी मॉरिसन, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर, पॉमी बांग्वा, डॅरेन गंगा, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, सुनील गावसकर, अंजुम चोप्रा, लिसा स्थलेकर, मार्क निकोलस, कुमार संगाकारा आणि जेपी ड्युमिनी

हिंदी समालोचन समिती: आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, आशिष नेहरा, निखिल चोप्रा, संदीप पाटील, संजय बांगर, अजित आगरकर आणि किरण मोरे