अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबाद संघाला १४२ धावांवर रोखण्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला यश आलं. संपूर्ण सामन्यात कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या गोलंदाजांचा खुबीने वापर करत हैदराबादच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मनिष पांडेने हैदराबादकडून एकाकी लढत देत ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली.

१४३ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवातही खराब झाली. फटकेबाजी करण्यात माहीर असलेल्या सुनील नरिनला खलिल अहमदने शून्यावर माघारी धाडलं. अहदमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील नरिनने वॉर्नरच्या हाती झेल दिला. तो एकही धाव करु शकला नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलमध्ये खलिल आणि नरिन यांचं द्वंद्व चांगलंच गाजतं. गेल्या ३ चेंडूत खलिलने दोनवेळा नरिनला माघारी धाडलंय.

सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेणारा वॉर्नर पहिला कर्णधार ठरला. मात्र वॉर्नरचा हा निर्णय हैदराबादच्या फलंदाजांनी फोल ठरवला.