आज कोलकाता नाइट रायडर्सशी लढत

शारजा : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करताना किंग्ज इलेव्हन पंजाब सलग पाचवा विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे.

पंजाबचे ११ सामन्यांतून पाच विजय आणि सहा पराभवांसह १० गुण आहेत. याउलट कोलकात्याचे ११ सामन्यांतून सहा विजय आणि पाच पराभव यांच्यासह १२ गुण आहेत. कोलकाता चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानी आहे. जर कोलकाताविरुद्धच्या लढतीत विजय मिळवता आला तर पंजाबला चौथे स्थान मिळवता येईल. याउलट कोलकाता जिंकला तर चौथे स्थान त्यांना राखता येईल. बाद फेरीसाठीची चुरस तीव्र होत असताना उभय संघांना पराभव परवडणारा नाही.

पंजाबने पाच सामन्यांच्या पराभवानंतर खेळ उंचावत सलग चार विजय मिळवले. त्यामुळे बाद फेरीसाठीच्या शर्यतीत त्यांना राहता आले. पंजाबच्या मागील चार विजयांमधील तीन विजय हे त्यांनी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या अव्वल संघांवर मिळवले आहेत. अर्थातच बाद फेरी गाठण्यासाठी आणखी पराभव पंजाबला परवडणारे नाहीत. गोलंदाजी ही पंजाबसाठी सर्वात चिंतेची बाब आहे. मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोई यांचा अपवाद वगळता एकही गोलंदाज पंजाबसाठी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. अखेरच्या षटकांत पंजाबच्या गोलंदाजांकडून प्रतिस्पध्र्याना भरपूर धावा दिल्या जात आहेत. मात्र शनिवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत अवघ्या १२६ धावा असताना पंजाबच्या गोलंदाजांनी १२ धावांनी विजय मिळवून दिला. के. एल. राहुल, मयांक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन हे पंजाबचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत.

कोलकात्याने शनिवारी दुसऱ्या स्थानी असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला ५९ धावांनी नमवताना चांगला खेळ केला. नितीश राणाला सलामीला पाठवण्याचा कोलकात्याचा प्रयोग भलताच यशस्वी झाला. सुनील नरिनचीही अर्धशतकी फटकेबाजी दिल्लीविरुद्धच्या विजयात योगदान देणारी ठरली. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनेही पाच बळी घेत त्याची गोलंदाजीची लय दाखवून दिली. बाद फेरीचा विचार करण्यासाठी कोलकात्याला फलंदाजीत सातत्य टिकवण्याची गरज आहे. फग्र्युसन, पॅट कमिन्स ही वेगवान दुकलीही कोलकात्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १