आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ सुरु ठेवला आहे. शारजाच्या मैदानावर मुंबईने चेन्नई सुपरकिंग्जला ११४ धावांवर रोखत, विजयासाठी आवश्यक असलेलं ११५ धावांचं आव्हान १० गडी राखून पूर्ण केलं. रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे कायरन पोलार्डने मुंबईच्या संघाचं नेतृत्व केलं. परंतू संपूर्ण सामन्यात पोलार्डने कुशलतेने गोलंदाजीत बदल करुन रोहितची उणीव भासू दिली नाही. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईचा डाव गडगडला.

२०२० हे वर्ष अनेकांसाठी वाईट जात असलं तरीही कायरन पोलार्डची कर्णधार म्हणून या वर्षातली कामगिरी ही नक्कीच वाखणण्याजोगी आहे. आतापर्यंतच्या १७ सामन्यांपैकी १५ सामन्यांत पोलार्डने आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. मुंबईचे चेन्नईवर मिळवलेला धडाकेबाज विजय हा पोलार्डचा कर्णधार म्हणून सलग १५ वा विजय ठरला आहे.

आयपीएलच्या आधी कॅरेबिअन प्रिमीअर लिग स्पर्धेतली पोलार्डने त्रिंबागो नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पोलार्डने आपल्या संघाला सलग १२ विजय मिळवून देत विजेतेपदावर मोहर उमटवली होती.

दरम्यान चेन्नईने विजयासाठी दिलेलं ११५ धावांचं आव्हान मुंबईने इशान किशन आणि क्विंटन डी-कॉकच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. चेन्नई सुपरकिंग्जला आयपीएलमध्ये १० गडी राखून हरवणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे.