ऋतुराज गायकवाड आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ गडी राखून मात केली. १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गायकवाड-वॉटसन आणि यानंतर गायकवाड-रायुडू यांच्या भागीदारीवेळी चेन्नईचा संघ सामन्यात सहज बाजी मारेल असं वाटत होतं. परंतू मोक्याच्या क्षणी अंबाती रायडू माघारी परतल्यामुळे चेन्नईच्या डावाला गळती लागली आणि सामना KKR च्या दिशेने झुकला.

अंबाती रायुडू माघारी परतल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला. परंतू त्याच्या अपयशाची परंपरा या सामन्यातही कायम राहिली. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर अवघी एक धाव काढून धोनी माघारी परतला. पाहा हा व्हिडीओ…

महेंद्रसिंह धोनीचा एकाच हंगामात दोनवेळा क्लिनबोल्ड करणारा दुसरा गोलंदाज हा बहुमान यानिमीत्ताने वरुण चक्रवर्तीला मिळाला आहे. याआधी लसिथ मलिंगाला अशी कामगिरी जमली होती.

याचसोबत तब्बल ३ वर्षांनी एका गोलंदाजाने एकाच हंगामात २ वेळा धोनीला बाद करण्याची किमया केली आहे. याआधी २०१७ साली जसप्रीत बुमराहने एकाच हंगामात दोनदा धोनीला बाद केलं होतं. पाहूयात या यादीतले इतर गोलंदाज –

  • प्रज्ञान ओझा – २००८
  • वॅन डर मर्व – २००९
  • झहीर खान – २०११
  • कुलदीप यादव – २०१७
  • जसप्रीत बुमराह – २०१७
  • वरुण चक्रवर्ती – २०२०*

दरम्यान, ७२ धावांची खेळी करुन संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावणाऱ्या ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.