आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये चौथ्या स्थानासाठीची शर्यत अधिकच रंगतदार होत चालली आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने १७२ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार धोनीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. परंतू शुबमन गिल माघारी परतल्यानंतर KKR च्या डावाला गळती लागली.

परंतू नितीश राणाने एक बाजू लावून धरत चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. एकीकडे आपली साथीदार झटपट माघारी परतत असताना नितीशने महत्वाच्या षटकांमध्ये धावा जमवत आपला संघ मागे राहणार नाही याची काळजी घेतली. ६१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नितीशने ८७ धावा केल्या. आयपीएलच्या तेराव्या हंगामात KKR च्या फलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

चेन्नईकडून लुन्गिसानी एन्गिडीने २ तर सँटनर-जाडेजा आणि शर्मा या फिरकी त्रिकुटाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.