16 January 2021

News Flash

IPL 2020: एका इंचाने पंजाब पराभूत; शेवटच्या चेंडूवर कोलकाता विजयी

कर्णधार केएल राहुलची ७४ धावांची खेळी व्यर्थ

IPL 2020 मधील अतिशय रोमांचक अशा सामन्यात कोलकाताच्या संघाने पंजाबला शेवटच्या चेंडूवर २ धावांनी पराभूत केले. १७ षटकांपर्यंत अतिशय शानदार स्थितीत असणाऱ्या पंजाबला शेवटच्या चेंडूवर सामना सुपरओव्हरमध्ये नेण्यासाठी षटकाराची गरज होती, पण अवघ्या एका इंचाने चेंडू सीमारेषेनजीक पडला आणि पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या. २९ चेंडूत दिनेश कार्तिकने ५८ धावा करत पंजाबला १६५ धावांचे लक्ष्य दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार राहुलने ७४ धावांची खेळी केली, पण मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली.

पाहा नाट्यमय शेवटचं षटक-

नाणेफेक जिंकून कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सुरूवातीच्या षटकांमध्ये हा निर्णय फसल्यासारखं वाटलं. राहुल त्रिपाठी ४ धावांवर तर नितीश राणा २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल आणि मॉर्गन या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मॉर्गन खेळपट्टीवर स्थिरावला असतानाच झेलबाद झाला. त्याने २३ चेंडूत २ चौकार व १ षटकार खेचत २४ धावा केल्या. मग गिल आणि कर्णधार कार्तिक यांना कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ८२ धावांची भागीदारी केली. याचदरम्यान दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. गिल ५७ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसेलही ५ धावांवर माघारी परतला. कार्तिक मात्र शेवटपर्यंत मैदानात उभा होता. त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, बिश्नोई आणि सिंग यांनी १-१ बळी टिपला.

पाहा दिनेश कार्तिकची धमाकेदार खेळी-

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा २ धावांनी पराभव झाला. सामना शेवटपर्यंत लांबवण्याचा प्रयत्न पंजाबच्या चांगलाच अंगाशी आला. मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी दमदार शतकी सलामी दिली. त्यांनी विजयासाठी आवश्यक धावगतीशी मिळतीजुळती फटकेबाजी केली. १४व्या षटकात ११५ धावांवर पंजाबने मयंक अग्रवालचा बळी गमावला. त्याने ५६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनला फटकेबाजी करता आली नाही. तो १६ धावांवर बाद झाला. दमदार खेळी करणारा राहुलदेखील १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने ५८ चेंडूत ६ चौकारांसह ७४ धावा केल्या.

शेवटच्या तीन षटकात धावांचा ओघ आटल्याने शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर पहिल्या पाच चेंडूंवर मॅक्सवेलने कसाबसा एक चौकार लगावला. त्यामुळे एका चेंडूत पंजाबला विजयासाठी ७ धावांची तर सुपर ओव्हरसाठी ६ धावांची आवश्यकता होती. मॅक्सवेलने ऑफसाइडला पडलेला चेंडू हवेत उडवलादेखील…. पण अवघ्या काही इंचांनी चेंडू सीमारेषेच्या आत पडला आणि पंजाबला केवळ ४ धावाच मिळू शकल्या. आजच्या पराभवामुळे पंजाबने ७ पैकी ६ सामने गमावले असून आता त्यांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणं आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 5:45 pm

Web Title: ipl 2020 kkr vs kxip live updates kings xi punjab kolkata knight riders dinesh karthik shubman gill kl rahul mayank agarwal glenn maxwell vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video: नुसता गोंधळ! एकाच दिशेने धावले दोन्ही फलंदाज अन्…
2 Video: सुपर स्विंग! फलंदाजाला कळण्याआधीच मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा
3 IPL 2020: “थोडी लाज बाळगा”, भडकलेल्या आकाश चोप्राने केलं ट्विट
Just Now!
X