इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

कोलकाता नाइट रायडर्सला बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे. तर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई मात्र कोलकाताला पराभूत करून त्यांची डोकेदुखी वाढवू शकते.

चेन्नईच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. मात्र कोलकाताला नमवून ते बाद फेरीसाठी पहिल्या सहा संघांमध्ये असणारी स्पर्धा तीव्र करू शकतात. किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्या सात लढतींत एकच विजय मिळवला होता. मात्र नंतर खेळलेल्या सलग पाच लढतींत विजय मिळवला. त्यामुळे पंजाबने कोलकात्याला मागे टाकून चौथे स्थान मिळवले. पंजाब आणि कोलकाता यांचे प्रत्येकी १२ गुण असून सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचे प्रत्येकी १० गुण आहेत. ही सर्व गणिते पाहता कोलकाताला उर्वरित दोन लढतींत फक्त विजयाचाच विचार करावा लागेल.

चेन्नईला कमी लेखण्याची चूक कोलकाताला महागात पडू शकते. कोलकातासाठी फलंदाजी ही चिंतेची बाब आहे. फलंदाजांचा बदलता क्रम हेदेखील कोलकात्याच्या अपयशाचे कारण ठरले आहे. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स अपयशी ठरला असला तरी फिरकीपटू वरुण चक्रवर्ती प्रभावी ठरला आहे.

चेन्नईच्या फलंदाजांची फळी सर्वोत्तम आहे. मात्र त्यांच्यात सातत्याचा अभाव दिसत आहे. युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघात झालेली निवड सार्थ ठरवली आहे. चेन्नईच्या बाद फेरीच्या आशा संपल्या असल्या तरी हंगामाच्या अखेरीस प्रतिष्ठा जपण्यासाठी ते उत्सुक आहेत.

* सामन्याची वेळ : सायं. ७:३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, सिलेक्ट १ आणि ‘एचडी’.

पुढील हंगामासाठी धोनीच कर्णधार!

‘आयपीएल’च्या पुढील हंगामासाठीसुद्धा महेंद्रसिंह धोनीलाच कर्णधारपदी कायम राखण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला असल्याची माहिती चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली.

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईला यंदा प्रथमच ‘आयपीएल’ची बाद फेरी गाठण्यात अपयश आले. ‘‘यंदाचा हंगाम आमच्यासाठी निराशाजनक होता. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही धोनीकडून कर्णधारपद हिसकावून घेऊ. पुढील हंगामासाठी युवा खेळाडूंसह संघबांधणी करण्यासाठी धोनीचा दृष्टिकोन आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण असेल आणि तोसुद्धा कर्णधारपदावरून पायउतार होणार नाही, याची मला खात्री आहे,’’ असे विश्वनाथन म्हणाले.