आयपीएलचा तेरावा हंगाम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघासाठी खडतर जाताना दिसत आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यात पंजाबला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस जोडीने फटकेबाजी करत चेन्नईला १० गडी राखून विजय मिळवून दिला. यानंतर हैदराबादविरुद्ध सामन्यातही पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच कस लागला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत १६० धावांची भागीदारी केली.

चेन्नईविरुद्ध सामन्याआधी पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरची विकेट काढली ती मुंबई इंडियन्सविरुद्ध…१७ व्या षटकात पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची विकेट घेतली होती. यानंतर दुसरी विकेट घेण्यासाठी पंजाबच्या गोलंदाजांना २१९ चेंडू म्हणजेच ३६.३ षटकांची वाट पहावी लागली.

रवी बिश्नोईने एकाच षटकात वॉर्नर आणि बेअरस्टोला माघारी धाडत पंजाबला यश मिळवून दिलं. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं.

वॉर्नर आणि बेअरस्टो जोडी मैदानावर असताना हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. परंतू मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हैदराबादला ती किमया साधता आली नाही. अखेरीस विल्यमसनने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत हैदराबादला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.