कोलकाता विरूद्धच्या सामन्यात पंजाबच्या संघाने ८ गडी राखून दमदार विजय मिळवला. या विजयामुळे पंजाबचे स्पर्धेतील आव्हान कायम राहण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. पंजाबला हा विजय मिळवून देण्यात मनदीप सिंग आणि ख्रिस गेल यांची भागीदारी महत्वाची ठरली. सलामीला आलेल्या मनदीपने नाबाद ६६ धावा केल्या तर गेलने तुफानी खेळी करत ५१ धावांचा पाऊस पाडला. हा पंजाबचा स्पर्धेतील पाचवा विजय ठरला. या विजयाच्या जोरावर पंजाबने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. या विजयानंतर सर्वच स्तरातून मनदीपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर आभाळाकडे पाहात ते वडिलांना समर्पित केलं. याच खेळीबद्दल सामन्यानंतर बोलताना मनदीपने ही खेळी आणि त्यातही नाबाद राहणं अधिक खास का होतं यासंदर्भातील खुलासा केला.

शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचं निधन झालं. आयपीएलच्या तेराव्या हंगामाला निघण्याआधीच मनदीपच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. याच आजारपणामुळे त्यांचे २३ ऑक्टोबर रोजी निधन झालं. तरी मनदीप दुसऱ्याच दिवशी सर्व धैर्य दाखवून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदनात उतरला. मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. मात्र या सामन्यानंतर सोमवारी कोलकाताविरुद्ध खेळताना मनदीपने सर्व कसर भरुन काढली. शनिवारचा विजय पंजाबच्या संघाने मनदीपच्या वडिलांना समर्पित केला. तर सोमवारी मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर वडिलांना अभिवादन केलं. इतकच काय तर पंजाबला कर्णधार के. एल. राहुल यानेही ड्रींक्स ब्रेकदरम्यान मैदानात धाव घेत मनदीपला मिठी मारत त्याचे अभिनंदन केलं.

सामन्यानंतर आपल्या खेळीसंदर्भात बोलताना मनदीपने ही खेळी माझ्यासाठी फारच खास असल्याचे सांगितले. “माझे बाबा मला नेहमी प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यासंदर्भात सल्ला द्यायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे १०० असो किंवा २०० धावसंख्या असो तू नाबाद राहिलं पाहिजेस. सामन्याआधी मी राहुलबरोबर संवाद साधला होता. मागील सामन्यात मी वेगाने धावा करण्याच्या नादात बाद झालो. मी माझा नॉर्मल गेम खेळलो तर मी सामना जिंकवून देऊ शकतो. यावर माझा विश्वास आहे असं मी राहुलला सांगितले. त्यावर राहुलने मला योग्य वाटेल त्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला दिला,” असं मनदीपने सांगितलं.

मनदीपसोबत विजयासाठी महत्वाची भागीदारी करणाऱ्या ख्रिस गेलनेही मनदीपला प्रोत्साहन दिल्याचे त्याने सांगितले. फलंदाजी करत राहा आणि शेवटपर्यंत खेळ एवढाच सल्ला मला गेलने दिला होता. त्यावर मी त्याला तू निवृत्त होऊ नकोस असा मजेदार सल्ला दिल्याचे, मनदीपने सांगितले.