दुबई : ‘आयपीएल’च्या रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब पराभवाची कोंडी फोडण्यासाठी मैदानात उतरतील. उभय संघांना चारपैकी तीन लढतीत पराभव पत्करावा लागल्याने या सामन्याद्वारे विजयीपथावर परतण्याचे दोन्ही संघांचे उद्दिष्ट असेल. अंबाती रायुडू व ड्वेन ब्राव्हो यांचे पुनरागमनही चेन्नईला तारू शकले नाही. सलामीवीर शेन वॉटसन आणि केदार जाधव यांचे अपयश चेन्नईला महागात पडत आहे.

’ सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मी फलंदाज म्हणून सपशेल अपयशी ठरलो. त्याशिवाय संपूर्ण संघालाही अनेक बाबींवर आताच सुधारणा करण्याची गरज आहे.

-महेंद्रसिंह धोनी, चेन्नईचा कर्णधार

हैदराबादविरुद्ध मुंबईचे पारडे जड

शारजा : धडाके बाज फलंदाजांची फळी आणि अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणारा गोलंदाजीचा मारा ही वैशिष्टय़े जपणाऱ्या मुंबई इंडियन्सचे रविवारी ‘आयपीएल’मधील सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणारा भुवनेश्वर कुमार या सामन्यात खेळू न शकल्यास हैदराबादच्या चिंतेत भर पडेल.

सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.

 

सट्टेबाजाने संपर्क साधल्याची खेळाडूची कबुली

नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये खेळत असलेल्या एका खेळाडूने आपल्याशी सट्टेबाजांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या संदर्भात ‘बीसीसीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास सुरू केला असून या खेळाडूचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ऑनलाइन संवादाद्वारे हा प्रस्ताव खेळाडूसमोर ठेवल्याचे प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले.