आयपीएलच्या तेराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज मयांक अग्रवालने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली आहे. दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मयांकने आक्रमक अर्धशतक झळकावलं होतं. दुर्दैवाने पंजाबने हा सामना सुपरओव्हरमध्ये गमावला. परंतू यानंतरच्या सामन्यांत दमदार पुनरागमन करत पंजाबने बंगळुरुवर मात केली. शारजात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही मयांकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत षटकारांचा पाऊस पाडला. राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत मयांकने शतकी खेळी केली. आयपीएलमधलं मयांकचं हे पहिलं शतक ठरलं आहे.

राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत मयांकने सामन्यात षटकारांची आतिषबाजी केली. ५० चेंडूत १०६ धावांची खेळी करताना १० चौकार आणि ७ षटकार मयांकने लगावले. शारजामधील छोट्या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलत मयांकने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. कर्णधार लोकेश राहुलनेही त्याला उत्तम साथ दिली.

मयांक अग्रवाल हा स्थानिक क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट खेळून नावारुपाला आला. मात्र गेल्या काही वर्षांत त्याने टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आपली फलंदाजीची शैली बदलली आहे. २०११ ते २०१९ या काळात मयांकने आयपीएलमध्ये ७२ डावांपैकी फक्त एका डावात ४ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले होते. मात्र यंदाच्या हंगामात मयांकचं वेगळंच रुप समोर येतं आहे. आतापर्यंत झालेल्या ३ डावांपैकी २ डावांत मयांकने ४ किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत.

मयांकने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्लाबोल लोकेश राहुलसोबत शतकी भागीदारी केली. लोकेश राहुलनेही एक बाजू लावून धरत मयांकला उत्तम साथ दिली. अखेरीस टॉम बँटनने मयांकला माघारी धाडत पंजाबची जोडी फोडली. लोकेश राहुल ६९ धावा काढून माघारी परतला.