करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन भारतात स्थगित करण्यात आलं. स्पर्धा रद्द होण्यच्या मार्गावर असताना बीसीसीआयने ४ हजार कोटींचं नुकसान टाळण्यासाठी युएईत यंदाचा हंगाम आयोजित करण्याचा घाट घातला. यानंतर हो-नाही, हो-नाही म्हणता म्हणता अखेरीस तो दिवस येऊन ठेपला आहे. आजपासून युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जाईल. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे.

मुंबई आणि चेन्नई हे दोन संघ आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघ मानले जातात. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा म्हणजेच ४ तर चेन्नईने ३ वेळा विजेतेपदं पटकावली आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याला सोशल मीडियावरही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रुप दिलं जातं. दोन्ही संघाचे चाहते या सामन्यादरम्यान सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. परंतू आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात आतापर्यंत लढण्यात आलेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं पारडं जड राहिलेलं आहे.

चॅम्पिअन्स लिगमधील दोन सामने पकडले असता मुंबई आणि चेन्नईचा संघ आतापर्यंत ३० वेळा समोरासमोर आले आहेत. ज्यापैकी १८ सामने मुंबईने जिंकले असून १२ सामने चेन्नईने जिंकले आहेत. २०१९ साली झालेल्या हंगामात मुंबईने साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्व सामन्यांत बाजी मारली होती. त्यानंतर हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा तेराव्या हंगामात समोरासमोर येणार आहेत. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.