मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय; इशान किशनचं नाबाद अर्धशतक

Dream11 IPL 2020 UAE MI vs CSK: चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या चेन्नईची सुरूवात खूपच खराब झाली. ऋतुराज गायकवाड (०), अंबाती रायडू (२), जगदीशन (०), फाफ डु प्लेसिस (१) आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा (७) हे फलंदाज पॉवरप्लेमध्येच बाद झाले. कर्णधार धोनी संयमी खेळत असतानाच राहुल चहरने धोनीला (१६) झेलबाद करवले. नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने ४ तर बुमराह आणि राहुल चहरने २-२ बळी टिपले. नॅथन कुल्टर-नाइलनेही एका फलंदाजाला माघारी धाडलं.

११५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन आणि क्विंटन डी कॉक ही जोडी सलामीला आली. मुंबईकडून IPL इतिहासात पहिल्यांदाच दोन डावखुऱ्या फलंदाजांनी सलामी केली. या दोघांनी CSKच्या गोलंदाजांंचा यथेच्छ समाचार घेतला. इशान किशनने नाबाद अर्धशतक ठोकलं. त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ६८* धावा कुटल्या. तर क्विंटन डी कॉकने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४६* धावा केल्या. या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

रोहित दुखापतग्रस्त…

सामन्यात महत्त्वाची बाब म्हणजे नाणेफेकीसाठी रोहित शर्मा अनुपस्थित होता. दुखापतीमुळे रोहितला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी कायरन पोलार्ड टॉससाठी मैदानात आला. रोहितच्या जागी संघात सौरभ तिवारीला स्थान देण्यात आले होते.

Live Blog

22:25 (IST)23 Oct 2020
इशान किशनचा CSKला 'दे धक्का'; मुंबईचा दणदणीत विजय

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय साजरा केला. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या फलंदाजांनी गुडघे टेकत फक्त ११४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या इशान किशन-क्विंटन डी कॉक जोडीने नाबाद शतकी भागीदारी करत लक्ष्य पूर्ण केलं. किशनने नाबाद ६८ तर डी कॉकने नाबाद ४६ धावा केल्या आणि मुंबईला १० गडी राखून विजय मिळवून दिला.

22:18 (IST)23 Oct 2020
इशान किशनचं दमदार अर्धशतक

इशान किशनने नाबाद अर्धशतक ठोकलं. त्याने ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ३७ चेंडूत ६८* धावा कुटल्या. 

21:40 (IST)23 Oct 2020
मुंबईची दमदार सुरूवात; डी कॉकसोबत सलामीला किशनला संधी

रोहित शर्मा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात सहभागी झालेला नाही. त्यामुळे क्विंटन डी कॉकसोबत सलामीला इशान किशनला संधी देण्यात आली आहे. मुंबईकडून IPL इतिहासात पहिल्यांदाच दोन डावखुऱ्या फलंदाजांनी सलामी केली.

21:27 (IST)23 Oct 2020
सॅम करनचे झुंजार अर्धशतक

नवख्या सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शंभरी पार करून दिली. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या.

21:04 (IST)23 Oct 2020
शार्दुल ठाकूर झेलबाद; चेन्नईला आठवा धक्का

शार्दुल ठाकूर झेलबाद; चेन्नईला आठवा धक्का

20:41 (IST)23 Oct 2020
सॅम करनने राखली CSKची लाज

पन्नाशीच्या आत७ गडी बाद झाल्यावर सॅम करनने एकाकी झुंज देत CSKची लाज राखली.

20:18 (IST)23 Oct 2020
धक्कादायक! पन्नशीच्या आतच CSKचे ७ गडी माघारी

दीपर चहर शून्यावर बाद झाला. राहुल चहरने त्याला डी कॉककरवी स्टंपिंग केलं.

20:08 (IST)23 Oct 2020
धोनी बाद; CSKचे ३० धावांत ६ बळी माघारी

कर्णधार धोनी शांतपणे खेळत असतानाच राहुल चहरच्या फिरकीवर षटकार मारण्याचा मोह त्याला आवरला नाही. त्याने एक षटकार लगावला पण पुढच्या चेंडूवर तसाच फटका खेळताना तो झेलबाद झाला.

20:05 (IST)23 Oct 2020
२१ धावांत चेन्नईचा निम्मा संघ माघारी

अष्टपैलू रविंद्र जाडेजा गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे २१ धावांत चेन्नईचा निम्मा संघ माघारी तंबूत परतला.

19:53 (IST)23 Oct 2020
चेन्नईला चौथा धक्का; डु प्लेसिस १ धाव काढून माघारी

स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा फाफ डु प्लेसिसही स्वस्तात बाद झाला. बोल्टने त्याला एका धावेवर माघारी धाडलं.

19:43 (IST)23 Oct 2020
बुमराहचे २ चेंडूत २ बळी; चेन्नईची खराब सुरूवात

सामन्याच्या दुसऱ्यात षटकात जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत २ चेंडूत २ बळी टिपले. अंबाती रायडू २ धावांवर तर जगदीशन शून्यावर माघारी परतला. 

19:37 (IST)23 Oct 2020
चेन्नईला पहिला धक्का; ऋतुराज गायकवाड पायचीत

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता पायचीत झाला.

19:11 (IST)23 Oct 2020
मुंबईच्या कर्णधारपदी कायरन पोलार्ड, कारण...

महत्त्वाची बाब म्हणजे नाणेफेकीसाठी रोहित शर्मा अनुपस्थित होता. दुखापतीमुळे रोहितला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी कायरन पोलार्ड टॉससाठी मैदानात आला. रोहितच्या जागी संघात सौरभ तिवारीला स्थान देण्यात आले.

19:10 (IST)23 Oct 2020
चेन्नईच्या संघात तीन महत्त्वाचे बदल; शेन वॉटसन संघाबाहेर

चेन्नईच्या संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले. शेन वॉटसन, केदार जाधव आणि पियुष चावला यांना संघाबाहेर करण्यात आलं असून त्याच्या जागी जगदीशन, ऋतुराज गायकवाड आणि इम्रान ताहीर यांना संघात स्थान देण्यात आलं.

19:10 (IST)23 Oct 2020
नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी

मुंबईचा संघाने नाणेफेक जिंकून कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.