आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करुन दणक्यात सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जची पुढच्या काही सामन्यांमध्येच गाडी रुळावरुन खाली घसरली. गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकल्या गेलेल्या चेन्नईने शारजाच्या मैदानावर मुंबईविरुद्ध सामन्यात निराशाजनक खेळ केला. नाणेफेक जिंकून मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, राहुल चहर यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईने सपशेल शरणागती पत्करली.

अवश्य वाचा – IPL 2020 : सॅम करन – इम्रान ताहीर जोडीने राखली चेन्नईची लाज

चेन्नईकडून सॅम करनने एकाकी झुंज देत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. करनने इम्रान ताहीरसोबत नवव्या विकेटसाठी महत्वपूर्ण ४३ धावांची भागीदारी केली. एका क्षणाला चेन्नईचा संघ शंभर धावा करु शकेल की नाही असं वाटत होतं, परंतू करन आणि ताहीरने मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करत सामन्याचं चित्र पालटलं. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात यशस्वी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना करनला बाद करण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागले. अखेरीस ट्रेंट बोल्टने पहिल्या डावातला अखेरच्या चेंडूवर बोल्टचा त्रिफळा उडवा. बोल्टने टाकलेला हा यॉर्कर इतका भन्नाट होता की स्टम्प उडाल्यानंतर करन अक्षरशः गुडघ्यावरच बसला. पाहा हा व्हिडीओ…

मुंबईकडून ट्रेंट बोल्टने ४, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहरने प्रत्येकी २-२ तर कुल्टर-नाईलने १ बळी घेतला. सॅम करनने एकाकी झुंज देत मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करत ४७ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. इम्रान ताहीरनेही नाबाद १३ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईविरुद्ध CSK ची आघाडीची फळी सपशेल फेल, नावावर नकोशा विक्रमाची नोंद