07 March 2021

News Flash

IPL 2020 : ९ गडी राखत मुंबईचा दणदणीत विजय, दिल्लीसाठी प्ले-ऑफचं आव्हान खडतर

इशान किशनचं नाबाद अर्धशतक

फोटो सौजन्य - IPL.com

सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद ७२ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले.

त्याआधी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ सुरु ठेवला .प्ले-ऑफचं तिकीट मिळवल्यानंतरही दुबईच्या मैदानावर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दिल्लीला ११० धावांवर रोखलं आहे. दिल्लीचा एकही फलंदाज आज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दिल्लीच्या संघाला विजयाची आवश्यकता होती. परंतू मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर पहिल्या षटकापासून दिल्लीच्या फलंदाजांनी मान टाकायला सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने धवनचा झेल घेतला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला, बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी १० धावा काढून बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिल्लीची ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार पोलार्डने राहुल चहरला संधी दिली. चहरनेही आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात दिल्लीच्या कर्णधाराला अडकवत संघाला मोठं यश मिळवून दिलं. यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. बुमराह, चहर, बोल्ट, कुल्टर-नाईल यांनी एकामागोमाग एक दिल्लीला धक्के देणं सुरु ठेवलं. स्टॉयनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शेमरॉन हेटमायर यांनीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट फेकल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३-३ तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी १-१ बळी घेतला.

Live Blog

18:33 (IST)31 Oct 2020
इशान किशनचं फटकेबाजी करुन अर्धशतक

मुंबईची दिल्लीवर ९ गडी राखून मात, ४७ चेंडूत ८ चौकार-३ षटकारांसह इशान किशनच्या नाबाद ७२ धावा

18:12 (IST)31 Oct 2020
मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, क्विंटन डी-कॉक बाद

नॉर्जच्या गोलंदाजीवर डी-कॉक दुर्दैवी पद्धतीने त्रिफळाचीत, २६ धावांची केली खेळी

पहिल्या विकेटसाठी इशान किशनसोबत ६८ धावांची भागीदारी

18:01 (IST)31 Oct 2020
मुंबई इंडियन्सची आश्वासक सुरुवात

इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक जोडीची अर्धशतकी भागीदारी

17:41 (IST)31 Oct 2020
जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, दिल्लीच्या डावाला पाडलं खिंडार

३ बळी घेत केला महत्वाचा विक्रम, दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत मिळवलं स्थान. वाचा सविस्तर

17:11 (IST)31 Oct 2020
जसप्रीत बुमराहचा अखेरच्या षटकात भेदक मारा

दिल्लीला ११० धावांवर रोखण्यात मुंबईला यश, अखेरच्या चेंडूवर चोरटी धाव काढताना रबाडा धावबाद

दिल्लीची २० षटकांत ९ बाद ११० पर्यंत मजल, मुंबईला विजयासाठी १११ धावांचं आव्हान

17:01 (IST)31 Oct 2020
१९ व्या षटकात दिल्लीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर षटकार खेचत कगिसो रबाडाने राखली संघाची लाज

17:00 (IST)31 Oct 2020
फटकेबाजी करणारा रविचंद्रन आश्विनही बाद

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याने घेतला भन्नाट झेल, १२ धावा काढून आश्विन बाद

दिल्लीचा आठवा गडी माघारी परतला

16:46 (IST)31 Oct 2020
ठराविक अंतराने शेमरॉन हेटमायरही माघारी परतला

कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर कृणाल पांड्याने घेतला झेल, दिल्लीचा सातवा गडी बाद

११ धावा काढून हेटमायर बाद

16:45 (IST)31 Oct 2020
दिल्लीच्या फलंदाजांची घसरण सुरुच

हर्षल पटेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद, दिल्लीला सहावा धक्का

16:32 (IST)31 Oct 2020
ऋषभ पंतकडून पुन्हा निराशा, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झाला बाद

टप्पा पडून आत आलेल्या बुमराहच्या चेंडूवर पंत फसला

२१ धावा काढून पंत बाद, एकाच षटकात बुमराहचे दोन बळी

16:25 (IST)31 Oct 2020
दिल्लीच्या संकटात आणखी भर, स्टॉयनिस बाद

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर डी-कॉकने घेतला झेल, २ धावा काढून स्टॉयनिस बाद

16:23 (IST)31 Oct 2020
दिल्लीचा डाव सावरण्याची जबाबदारी आता ऋषभ पंतच्या खांद्यावर
16:20 (IST)31 Oct 2020
मोक्याच्या क्षणी दिल्लीला मोठा धक्का, कर्णधार श्रेयस अय्यर माघारी

राहुल चहरच्या लेगस्पिनच्या जाळ्यात अडकला श्रेयस अय्यर, यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकची सुरेख कामगिरी

अय्यरच्या २९ चेंडूत २५ धावा

16:19 (IST)31 Oct 2020
पंत-अय्यर जोडीने सावरला दिल्लीचा डाव

मुंबईच्या गोलंदाजांचा संयमी सामना करत गाठला ५० धावांचा टप्पा

15:46 (IST)31 Oct 2020
पृथ्वी शॉच्या अपयशाची मालिका सुरुच, दिल्लीला दुसरा धक्का

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर दोन चौकार लगावत पृथ्वीची चांगली सुरुवात, परंतू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी फसला

यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉकने घेतला झेल, बोल्टला दुसरा बळी. १० धावा काढत पृथ्वी बाद

15:37 (IST)31 Oct 2020
MI vs DC : मुंबई आणि दिल्लीनं ‘या’ पाच प्रमुख खेळाडूंना दिला आराम

IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायक सामन्यात मुंबई आणि दिल्लीनं आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत.... वाचा सविस्तर 

15:35 (IST)31 Oct 2020
मुंबईची धडाकेबाज सुरुवात, पहिल्याच षटकात शिखर धवन माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने घेतला भन्नाट कॅच

15:17 (IST)31 Oct 2020
टी-२० क्रिकेटमध्ये सत्ता मुंबईचीच, ही आकडेवारी पाहा
15:16 (IST)31 Oct 2020
मुंबईचा संघ खेळतोय आपला द्विशतकी आयपीएल सामना
15:14 (IST)31 Oct 2020
दिल्लीच्या संघातही ३ बदल, पृथ्वी शॉचं पुनरागमन

असा असेल दिल्लीचा अंतिम ११ जणांचा संघ

15:13 (IST)31 Oct 2020
असा असेल मुंबईचा अंतिम ११ जणांचा संघ

जयंत यादव आणि कुल्टर-नाईलला संघात स्थान

15:12 (IST)31 Oct 2020
मुंबईने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

संघात दोन बदल, हार्दिक पांड्या-जेम्स पॅटिन्सनला विश्रांती

टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : शतक हुकलेल्या गेलला संताप अनावर, बॅट फेकल्यामुळे सामनाधिकाऱ्यांकडून कारवाई
2 मी बॉलिंग करत असताना तो शतक करु शकणार नाही ! गेलची विकेट आणि आर्चरचं जुनं ट्विट व्हायरल
3 IPL playoffs : ६ सामने ठरवणार ६ संघाचं भविष्य
Just Now!
X