सलामीच्या सामन्यात पराभूत झालेल्या मुंबई इंडियन्सने बुधवारी कोलकाताविरूद्धच्या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला. २०१४ मध्ये युएईत झालेल्या ५ सामन्यांत आणि यंदा चेन्नई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावाचा समाना करावा लागल्यानंतर अखेर मुंबईने युएईत विजयाचं खात उघडलं. रोहित शर्माची तडाखेबाज ८० धावांच्या खेळी आणि भेदक गोलंदाजीमुळे मुंबईसमोर कोलकात्याचा निभाव लागला नाही. या सामन्यात सुरुवातील फलंदाजी करताना रोहितचे वर्चस्व दिसून आलं तर गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह चमकला. मात्र सामन्याच्या १८ व्या षटकामध्ये बुमराहची लय बिघडली आणि तळाला फलंदाजीसाठी आलेल्या कोलकात्याच्या पॅट कमिन्सने या एकाच षटकात २७ धावा ठोकल्या.

१८ व्या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या बुमराहला पॅट कमिन्सनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार, चौथ्या चेंडूवर दोन धावा पुन्हा पाचव्या चेंडूवर कमिन्सनने षटकार लगावला. यामुळे बुमराहची लय बिघडली आणि त्याने षटकाचा शेवटचा चेंडू वाइड टाकला. अखेर षटकातील अतिरिक्त चेंडूवरही कमिन्सनने षटकार लगावला. अशाप्रकारे बुहमराने एकाच षटकात २७ धावा (६+६+२+६+१+६) दिल्या.

बुमराहने वैयक्तिक चौथे आणि सामन्यातील अठरावे षटक टाकण्याआधी आपल्या तीन षटकांमध्ये केवळ पाच धावा दिल्या होत्या. पाच धावांच्या मोबदल्यात त्याने दोन बळी घेतले होते. मात्र शेवटच्या षटकात त्याने २७ धावा दिल्या. हे षटक बुमराहच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वात महागडे शतक ठरले. त्याचबरोबरच एखाद्या फलंदाजाने बुमराहला एकाच षटकात चार षटकार लगावण्याची ही पहिलीच वेळ होती.

मुंबईला या सामन्यात विजय नक्कीच मिळाला मात्र बुहमराच्या शेवटच्या षटकात एवढ्या धावा निघाल्या नसत्या तर मुंबईला हा विजय आणखीन अधिक फरकाने मिळवता आला असता. मात्र ४९ धावांच्या अंतराने मिळवलेल्या या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.