मुंबई आणि बंगळुरु यांच्यात दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात सुपरओव्हरमध्ये अखेरीस बंगळुरुने बाजी मारली. मुंबईने विजयासाठी दिलेलं ८ धावांचं आव्हान आरसीबीने सहज पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्यामध्ये सुपर ओव्हर वगळता दोन्ही संघांनी मिळून १२० चेंडूंमध्ये ४०० हून अधिक धावा केल्या. यामध्ये अगदी प्रथम फलंदाजी करताना एबी डिव्हीलियर्सने देवदत पडीकलसोबत केलेल्या फटकेबाजीपासून २०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या इशान किशनने केलेल्या ९९ धावांच्या खेळीपर्यंत अनेक खेळाडूंकडून भन्नाट कामगिरी पाहायला मिळाली. मात्र फलंदाजांचा खेळ समजल्या जाणाऱ्या या टी-२० सामन्यात एका गोलंदाजाची कामगिरी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा गोलंदाज आहे वॉशिंग्टन सुंदर. एकीकडे गोलंदाजांची धुलाई होत असतानाच चार षटकांमध्ये केवळ १२ धावा देणाऱ्या बंगळुरुच्या वॉशिंग्टनला सामनावीर पुरस्कार द्यायला हवा असं मत क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> “ही तर IPL मधील आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी”; ‘या’ खेळाडूच्या कामगिरीवर शास्त्री गुरुजी झाले फिदा

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात आरसीबीने बाजी मारली असली तरीही या सामन्यामधील अनेक खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक होताना दिसत आहे. यामध्ये अगदी ९९ धावांची खेळी करणारा मुंबई इंडियन्सच्या इशान किशन असो किंवा सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी न देणारा नवदीप सैनी असो, सर्वांनीच आपल्या कामगिरीच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. मात्र या सर्वांमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीचे सोशल नेटवर्किंगवर कौतुक होताना दिसत आहे. हर्ष भोगले यांनीही ट्विटवरुन वॉशिंग्टनचे कौतुक केलं आहे. “वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांमध्ये १२ धावा देत एक बळी घेतला. हे मान्य करणं थोडं कठीण आहे पण हेच खरं आहे. ४० षटकांमध्ये ४०० धावा झालेल्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे. याच गोष्टीमुळे निकाल फिरला. त्याला सामनावीर पुरस्कार द्यायला हवा होता असं कोणाला वाटतंय का?,” असं ट्विट हर्ष यांनी केलं आहे. हे ट्विट सामन्यातील पुरस्कार देण्याआधी त्यांनी केलं होतं.

हर्ष यांच्या या ट्विटला दीड हजारहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे तर २१ हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. अनेकांनी हर्ष यांच्या मताशी आपण सहमत असल्याचे रिप्लाय करुन सांगितलं आहे. विशेष म्हणजे वॉशिंग्टनलाच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा पुरस्कार देण्यात आला.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही वॉशिंग्टन सुंदरचे कौतुक केलं आहे.