देवदत पडीकल आणि जोशुआ फिलीप यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या आश्वासक भागीदारीनंतरही RCB ला १६४ धावांवरपर्यंत रोखण्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज यशस्वी झाले. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने महत्वाच्या षटकांमध्ये भेदक मारा करत RCB च्या धावगतीला अंकुश लावला. कर्णधार विराट कोहलीचा बळी घेत बुमराहने आयपीएलच्या इतिहासातला आपला १०० वा बळी नोंदवला. यानंतर १७ व्या षटकांत एकही धाव न देता दोन बळी घेत बुमराहने RCB ला मोक्याच्या क्षणी बॅकफूटला ढकललं. टी-२० क्रिकेटमध्ये १६ ते २० षटकं ही फटकेबाजीची षटकं ओळखली जातात. परंतु याचदरम्यान बुमराहने टिच्चून मारा करत RCB ला धक्के दिले.

पडीकल आणि शिवम दुबे यांना बुमराहने १७ व्या षटकात बाद केलं. या निमीत्ताने बुमराहने आपला मार्गदर्शक लसिथ मलिंगाच्या कामगिरीशी बरोबरी केली. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत १७ व्या षटकात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह आता मलिंगासह दुसऱ्या स्थानी आला आहे. पाहूयात कोण आहे या यादीत –

१) डेल स्टेन – १५ बळी

२) जसप्रीत बुमराह – १४ बळी*

३) लसिथ मलिंगा – १४ बळी*

मुंबईच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे RCB चा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. यादरम्यान बुमराहने आणखी काही विक्रमही आपल्या नावावर जमा केले.

बुमराहव्यतिरीक्त मुंबईकडून ट्रेंट बोल्ट आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. RCB कडून युवा देवदत पडीकलने ४५ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावांची खेळी केली.