दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केली आहे. दोन्ही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला. ज्यानंतर सामन्याचा निकाल सुपरओव्हरवर लावण्यात आला. मुंबईने सुपरओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना फक्त सात धावा केल्या. नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मुंबईचा संघ सुपरओव्हरमध्ये ७ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे RCB ला विजयासाठी ८ धावांचं सोपं आव्हान मिळालं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतू शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, मधल्या फळीत इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. विजयासाठी एका चेंडूत ५ धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात मागारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला. इशान किशनने ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकारांसह ९९ धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने ६० धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली.

सलामीवीर फिंच, पडीकल यांची अर्धशतकं आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर RCB ने मुंबईविरोधात २०१ धावांचा टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंच-पडीकल जोडीने आश्वासक सुरुवात करुन संघाची बाजू भक्कम केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी RCB च्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं. परंतू अखेरीस डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे RCB ने आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत डिव्हीलियर्सनेही नाबाद ५५ धावांची खेळी केली.

सलामीवीर फिंच आणि पडीकल यांनी बंगळुरुला चांगली सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर RCB चा वरचष्मा निर्माण केला. फिंचने फटकेबाजी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं. ट्रेंट बोल्टने फिंचला माघारी धाडत RCB ला पहिला धक्का दिला. फिंच ३५ चेंडूत ५२ धावा काढून माघारी परतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर मैदानावर आलेला कर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही.

मधल्या षटकांत RCB च्या धावगतीवर अंकुश लावण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. राहुल चहरच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या एबी डिव्हीलियर्सने देवदत पडीकलसोबत फटकेबाजी करुन संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. पडीकलनेही एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने ५४ धावांची खेळी केली. यानंतर डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत RCB ला सामन्यात दमदार पुनरागमन करुन दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने २ तर राहुल चहरने एक बळी घेतला.

Live Blog

23:55 (IST)28 Sep 2020
सुपरओव्हरमध्ये RCB ची बाजी, मुंबई इंडियन्सवर केली मात

विजयासाठी एक धाव हवी असताना कोहलीने लगावला चौकार...बुमराहचा सुपरओव्हरमध्ये भेदक मारा

23:36 (IST)28 Sep 2020
सुपरओव्हरमध्ये मुंबईची ७ धावांपर्यंत मजल

RCB ला विजयासाठी ८ धावांचं आव्हान

23:27 (IST)28 Sep 2020
सामना बरोबरीत, सुपरओव्हरमध्ये लागणार निकाल

विजायासाठी ५ धावांची गरज असताना पोलार्डने लगावला चौकार, सामना बरोबरीत

सुपरओव्हरमध्ये लागणार निकाल, आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर

23:26 (IST)28 Sep 2020
अखेरच्या षटकांत इशान किशन माघारी

९९ धावांवर किशन बाद, एका धावेमुळे हुकलं शतक

22:40 (IST)28 Sep 2020
इशान किशनचं अर्धशतक, मुंबईची झुंज सुरुच

झॅम्पाच्या गोलंदाजीवर षटकार खेचत इशान किशनचं अर्धशतक

परंतू सामन्यात अजुनही बंगळुरुची बाजू वरचढ

22:26 (IST)28 Sep 2020
इशान किशन - हार्दिक पांड्या जोडी फुटली

झॅम्पाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक पांड्या माघारी, केल्या १५ धावा

मुंबईची जमलेली जोडी फोडण्यात RCB ला यश

21:57 (IST)28 Sep 2020
मुंबईला तिसरा धक्का, क्विंटन डी-कॉक माघारी

युजवेंद्र चहलने घेतला बळी, मुंबईचे बिनीचे शिलेदार बाद

21:37 (IST)28 Sep 2020
मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव माघारी परतला

इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन डिव्हीलियर्सच्या हातात

भोपळाही न फोडता सूर्यकुमार बाद

21:33 (IST)28 Sep 2020
मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात, रोहित शर्मा माघारी

वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित नेगीकडे झेल देत माघारी, केल्या अवघ्या ८ धावा

21:10 (IST)28 Sep 2020
एबी डिव्हीलियर्स - शिवम दुबेची फटकेबाजी

RCB चा २० षटकांत २०१ धावांचा डोंगर, मुंबईला विजयासाठी २०२ धावांचं खडतर आव्हान

21:04 (IST)28 Sep 2020
एबी डिव्हीलियर्सची अखेरच्या षटकांत फटकेबाजी

मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत झळकावलं अर्धशतक

संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून देण्यात केली मदत

20:56 (IST)28 Sep 2020
देवदत पडीकल फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पोलार्डने घेतला झेल

४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह पडीकलच्या ५४ धावा

20:43 (IST)28 Sep 2020
देवदत पडीकलचं अर्धशतक

डिव्हीलियर्सच्या साथीने एक बाजू लावून धरत पडीकलची झुंज सुरुच

20:29 (IST)28 Sep 2020
RCB च्या धावगतीवर मुंबईचा अंकुश, कर्णधार विराट माघारी

राहुल चहरच्या गोलंदाजीवर विराट रोहितच्या हाती सोपा झेल देऊन माघारी

20:15 (IST)28 Sep 2020
RCB ची जोडी फोडण्यात मुंबईला यश

अर्धशतकवीर फिंच ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी, फिंचची ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी

सलामीच्या जोडीसाठी पडीकलसोबत ८१ धावांची भागीदारी, अर्धशतकी खेळीत लगावले ७ चौकार आणि एक षटकार

20:08 (IST)28 Sep 2020
सलामीवीर फिंचचं अर्धशतक

राहुल चहरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत साजरं केलं अर्धशतक

पडीकल-फिंच जोडीची आश्वासक सुरुवात, RCB भक्कम स्थितीत

19:57 (IST)28 Sep 2020
फिंच-पडीकल जोडीची आश्वासक सुरुवात

पॉवरप्लेच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई, ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा

19:10 (IST)28 Sep 2020
RCB च्या संघात ३ बदल

जाणून घ्या कोणाला मिळाली संधी आणि कोण गेलं संघाबाहेर...

19:09 (IST)28 Sep 2020
असा आहे मुंबईचा अंतिम ११ जणांचा संघ
19:03 (IST)28 Sep 2020
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

संघात एक बदल, सौरभ तिवारीच्या ऐवजी इशान किशनला संघात स्थान

18:54 (IST)28 Sep 2020
RCB च्या गोटातून आनंदाची बातमी

दोन नवीन खेळाडूंना मिळणार संधी...

18:50 (IST)28 Sep 2020
RCB ला जलदगती गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता

मुंबईविरुद्ध सामन्यात मॉरिस खेळणार की नाही?? जाणून घ्या...

18:48 (IST)28 Sep 2020
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आकडेवारी काय सांगते??