बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना इशान किशन आणि कायरन पोलार्डने फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत RCB च्या आक्रमणातली हवा काढून घेतली. इशान किशनने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत ५८ चेंडूत २ चौकार आणि ९ षटकार लगावत ९९ धावा केल्या. अखेरच्या षटकात शतकासाठी एका धावेची गरज असताना इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात किशन बाद झाला. यानंतर एका चेंडूत विजयासाठी ५ धावांची गरज असताना पोलार्डने चौकार लगावल्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लावण्यासाठी मुंबईचे फलंदाज पहिल्यांदा फलंदाजीसाठी आले. परंतू यावेळी इशान किशन ऐवजी पोलार्डसोबत हार्दिक पांड्या आल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या. अनेकांनी सोशल मीडियावर इशान किशनला संधी का दिली नाही असाही प्रश्न विचारला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर दिलं. “इशान पूर्ण थकला होता, त्याच्यात जराही त्राण उरला नव्हता. सुपरओव्हर खेळण्यासाठी तो सज्ज नव्हता. त्याला अजिबात फ्रेश वाटत नव्हतं म्हणून आम्ही हार्दिकचा पर्याय निवडला. हार्दिककडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सुपरओव्हरमध्ये ७ धावा केल्यानंतर तुम्हाला नशिबाची थोडी साथ लागतेच. मात्र एबीने मारलेला तो चौकार निर्णायक ठरला आणि सामना आम्ही गमावला.”

दरम्यान, नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकताना टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. मुंबईचा संघ सुपरओव्हरमध्ये ७ धावांपर्यंत मजल मारु शकला, ज्यामुळे RCB ला विजयासाठी ८ धावांचं सोपं आव्हान मिळालं. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतू शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : मूर्ती लहान पण खेळी महान ! फटकेबाजी करत इशान किशनने जिंकली सर्वांची मनं