स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मुंबई कडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. सूर्यकुमारची गेल्या काही महिन्यांमधली कामगिरी पाहता त्याला वन-डे संघात जागा मिळेल अशी सर्वांना आशा होती. परंतु सुनिल जोशी यांच्या निवड समितीने सूर्यकुमारच्या नावाचा विचार केला नाही. अनेक माजी खेळाडूंनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली, पण दुसरीकडे सूर्यकुमार यादव आपल्या संघासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावण्याचं काम सुरु ठेवतोय. अबु धाबीच्या मैदानावर RCB विरुद्ध सामन्यात संघ संकटात सापडलेला अर्धशतकी खेळी करत आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखवलं. RCB च्या गोलंदाजांचा समाचार घेताना सूर्यकुमारने ४३ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. सूर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीत १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातही खराब झाली. परंतू सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत मुंबईचं आव्हान अखेरपर्यंत कायम राखलं. RCB च्या गोलंदाजांवर प्रहार करत सूर्यकुमारने मोठ्या खुबीने कट, पूल, अपर कट, ड्राईव्ह, इनसाईड आऊट, फ्लिकच्या फटक्यांचा वापर केला. या अर्धशतकी खेळीच्या निमित्ताने सूर्यकुमार यादवने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्या Uncapped Players च्या यादीत सूर्यकुमारने पहिलं स्थान पटकावलं आहे.
Most 50s in IPL by Uncapped player
Suryakumar Yadav – 10*
Nitish Rana – 10
Ishan Kishan – 5
Rahul Tripathi – 5#MIvsRCB— CricBeat (@Cric_beat) October 28, 2020
RCB कडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी घेतला. परंतू मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात ते अपयशी ठरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 28, 2020 11:04 pm