News Flash

IPL 2020 : मुंबईने मारलं शारजाचं मैदान, हैदराबादवर ३४ धावांनी मात

हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरची एकाकी झुंज

छायाचित्र सौजन्य - IPL/BCCI

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला विजयी परंपरा कायम राखली आहे. शारजाच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. २०९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला हैदराबादचा संघ १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची खेळी करत आक्रमक खेळी केली. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनीही या सामन्यात टिच्चून मारा करत हैदराबादला फार मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.

जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर जोडीने हैदराबादच्या डावाची आश्वासक सुरुवात केली. ट्रेंट बोल्टने बेअरस्टोला माघारी धाडत मुंबईला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर यांनी पुन्हा एकदा भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी मैदानात स्थिरावणार असं वाटत असतानाच मनिष पांडे जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३० धावांची खेळी केली. यानंतर हैदराबदच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. एकीकडे कर्णधार वॉर्नर फटकेबाजी करत असतानाही केन विल्यमसन आणि प्रियम गर्ग स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नरही पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर इशान किशनकडे झेल देत माघारी परतला. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या.

यानंतर अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन आणि जसप्रीत बुमराहने यांनी प्रत्येकी २-२ तर कृणाल पांड्याने एक बळी घेतला.

त्याआधी, क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत कायरन पोलार्ड व पांड्या बंधूंनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात २०८ धावांपर्यंत मजल मारली. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांत चांगला मारा केला. परंतू अखेरच्या षटकांत मुंबईच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. डी-कॉकच्या ६७ धावा हे मुंबईच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. संदीप शर्माच्या पहिल्याच षटकात षटकार मारणारा कर्णधार रोहित शर्मा लगेचच झेलबाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी-कॉक यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन सामन्यांतील अपयशानंतर सूर्यकुमारला चांगला सूर गवसला होता. परंतू सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर स्कूपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार बाद झाला, त्याने २७ धावा केल्या. यानंतर इशान किशन आणि क्विंटन डी-कॉक जोडीने महत्वपूर्ण भागीदारी रचत मुंबईच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी ७८ धावांची भागीदारी केल्यामुळे मुंबईचा डाव सावरला. क्विंटन डी-कॉकने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं.

परंतू राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डी-कॉक माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६७ धावा केल्या. यानंतर इशान किशनही ठराविक अंतराने संदीप शर्माच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत मुंबईला डेथ ओव्हर्समध्ये चांगल्या धावा काढून दिल्या. सिद्धार्थ कौलने अखेरच्या षटकांत यॉर्कच चेंडू टाकत हार्दिक पांड्याला माघारी धाडलं. परंतू शारजामधील लहान मैदानाचा चांगला वापर करत मुंबईच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत मुंबईला २०८ धावांचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि सिद्धार्थ कौलने २ तर राशिद खान १ बळी घेतला.

Live Blog
19:32 (IST)04 Oct 2020
अखेरच्या षटकांत पोलार्डचा टिच्चून मारा

मुंबईची सामन्यात ३४ धावांनी बाजी, हैदराबाद पराभूत

19:22 (IST)04 Oct 2020
एकाच षटकात बुमरहाला दुसरं यश

अभिषेक शर्मा त्रिफळाचीत होऊन माघारी, हैदराबादच्या आशा मावळल्या

19:18 (IST)04 Oct 2020
युवा अब्दुल समद - अभिषेक शर्मा जोडीचा फटकेबाजीचा प्रयत्न

परंतू बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अब्दुल समद बाद

हैदराबादचा सहावा गडी माघारी परतला

18:59 (IST)04 Oct 2020
हैदराबादचा महत्वाचा गडी माघारी, डेव्हीड वॉर्नर बाद

६० धावा काढून वॉर्नर पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर बाद, इशान किशनने घेतला सुरेख झेल

18:58 (IST)04 Oct 2020
कृणाल पांड्याने गाजवला आजचा सामना
18:51 (IST)04 Oct 2020
प्रियम गर्ग माघारी, हैदराबादला चौथा धक्का

कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात, सीमारेषेवर राहुल चहरने घेतला सुरेख झेल

८ धावा काढून प्रियम गर्ग माघारी

18:45 (IST)04 Oct 2020
केन विल्यमसन माघारी, हैदराबादला तिसरा धक्का

ट्रेंट बोल्टच्या स्लो-बाऊंसरवर थर्ड-मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक डी-कॉककडे झेल देत विल्यमसन बाद

18:42 (IST)04 Oct 2020
कर्णधार डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक

मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत झळकावलं अर्धशतक

18:27 (IST)04 Oct 2020
हैदराबादची जमलेली जोडी फुटली, मनिष पांडे बाद

पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पांडे झेलबाद

कायरन पोलार्डने घेतला झेल, ३० धावा काढत पांडे माघारी

18:14 (IST)04 Oct 2020
वॉर्नर-पांडे जोडीने सावरला हैदराबादचा डाव

मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी

17:53 (IST)04 Oct 2020
हैदराबादची जोडी फुटली, जॉनी बेअरस्टो माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेल देत बेअरस्टो माघारी

17:45 (IST)04 Oct 2020
हैदराबादच्या राशिद खानचा शारजाच्या मैदानात टिच्चून मारा

गोलंदाजांची पिसं काढली जाणाऱ्या मैदानावर केली धडाकेबाज कामगिरी, जाणून घ्या...

17:25 (IST)04 Oct 2020
२०० पेक्षा जास्त धावसंख्या केल्यानंतर मुंबई इंडियन्सची IPL मधली कामगिरी
17:22 (IST)04 Oct 2020
अखेरच्या ३ चेंडूंमध्ये कृणाल पांड्याने केला विक्रम
17:19 (IST)04 Oct 2020
कृणाल पांड्याकडून अखेरच्या चेंडूवर फटकेबाजी

मुंबईकडून २०८ धावांचा डोंगर, हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचं आव्हान

17:12 (IST)04 Oct 2020
अखेरच्या षटकात हार्दिक पांड्या माघारी

सिद्धार्थ कौलच्या सुरेख यॉर्कर चेंडूने पांड्या क्लिन बोल्ड

17:09 (IST)04 Oct 2020
टी. नटराजनचा १९ व्या षटकांत भेदक मारा

यॉर्कर चेंडूंचा सुरेख मारा करत शारजाच्या मैदानात दिल्या फक्त १३ धावा

16:56 (IST)04 Oct 2020
आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार कोणी लगावले??

जाणून घ्या आकडेवारी...

16:53 (IST)04 Oct 2020
मुंबईला चौथा धक्का, इशान किशन माघारी

संदीप शर्माच्या गोलंदाजीवर फटकेबाजीच्या प्रयत्नात किशन बाद

सीमारेषेवर मनिष पांडेने घेतला सुरेख झेल, ३१ धावा काढून किशन बाद

16:44 (IST)04 Oct 2020
सचिन तेंडुलकर विचारतोय...

तुमचा अंदाज काय??

16:40 (IST)04 Oct 2020
मैदानावर स्थिरावलेला क्विंटन डी-कॉक बाद, राशिद खानने घेतला बळी

राशिदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत

राशिद खानने घेतला सुंदर झेल, ३९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह डी-कॉकच्या ६७ धावा

16:29 (IST)04 Oct 2020
सलामीवीर क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक

कामचलाऊ केन विल्यमसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचत साजरं केलं अर्धशतक

मुंबई इंडियन्सची झुंज सुरुच, इशान किशनचीही सुंदर फटकेबाजी

16:19 (IST)04 Oct 2020
सूर्यकुमारचा बळी घेत सिद्धार्थ कौलने केली महत्वाची कामगिरी
16:04 (IST)04 Oct 2020
मुंबईला दूसरा धक्का, सूर्यकुमार यादव बाद

सिद्धार्थ कौलच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार बाद, मुंबईची जमलेली जोडी फुटली

मोक्याच्या क्षणी मुंबईचा दुसरा गडी माघारी परतला

15:36 (IST)04 Oct 2020
मुंबईला सलामीच्या षटकातच मोठा धक्का, कर्णधार रोहित माघारी

संदीप शर्माच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक बेअरस्टोच्या हाती

६ धावा काढून मुंबईचा कर्णधार माघारी परतला

15:17 (IST)04 Oct 2020
हैदराबादविरूद्धच्या सामन्यासाठी मुंबईची खास तयारी...
15:14 (IST)04 Oct 2020
पाहा दोन्ही संघ...
15:09 (IST)04 Oct 2020
हैदराबादच्या संघातून भुवनेश्वर कुमार बाहेर

दुखापतीमुळे अनुभवी भुवनेश्वर कुमार संघाबाहेर... संदीप शर्माला संधी

15:09 (IST)04 Oct 2020
मुंबईच्या संघात बदल नाही...
15:07 (IST)04 Oct 2020
नाणेफेक जिंकत मुंबईचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Next Stories
1 IPL 2020 : जे कोणालाही जमलं नाही ते रविंद्र जाडेजाने करुन दाखवलं !
2 IPL 2020 : KKR ला चांगल्या कर्णधाराची गरज, नाव न घेता भारतीय गोलंदाजाचा कार्तिकला टोला
3 IPL 2020 : दिनेश कार्तिकने मॉर्गन आणि रसेलनंतर फलंदाजी करावी – गौतम गंभीर
Just Now!
X