१९ सप्टेंबरपासून IPLच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. सर्व संघ या हंगामासाठी कसून सराव करत आहेत. सारेच संघ आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्णधाराच्या नेतृत्वाखाली सराव सत्रात खेळत आहेत. २०१४ला झालेल्या IPLमध्ये युएईत अवघे २० सामने खेळण्यात आले होते. पण यंदा करोनाचा धोका लक्षात घेता अनेक नियम आणि अटींसहित संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. सुरूवातीला स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती, पण लॉकडाउनमुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर करोनाच्या फैलावाचा वेग कमी झाल्यानंतर अखेर आता १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेबाबत सुनील गावकसर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

“भारतीय क्रिकेटचे पुनरागमन आता जवळ आले आहे आणि सारेच त्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. IPL स्पर्धा ही स्थानिक क्रिकेटपटूंच्या प्रतिभेला व्यापक स्वरूप देते. मला खात्री आहे की यंदादेखील अनेक उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेत आपला ठसा उमटवतील. सध्या सर्वच संघ युएईमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष मुंबई विरूद्ध चेन्नई या सलामीच्या सामन्याकडे आहे. मला अशी अपेक्षा आहे की या स्पर्धेतून लाखो लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल.”, असे महत्त्वाचे विधान गावसकर यांनी केले.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतली असली तरी तो IPLमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई संघाचे नेतृत्व धोनी गेली अनेक वर्षे केले आहे. त्याच्याबद्दलही गावसकर यांनी मत व्यक्त केले. “धोनीला सारे जण जवळपास वर्षभराने क्रिकेट खेळताना पाहणार आहेत. मला नक्कीच खात्री आहे की सारेच जण त्याला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत”, असे गावसकर म्हणाले.