एरवी आयपीएलच्या प्रत्येक हंगामात अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या चेन्नई सुपरकिंग्जला तेराव्या हंगामात मोठ्या कालावधीनंतर एक विजय मिळाला आहे. हैदराबादविरूद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी विजय मिळवला. चेन्नईचा संघ यंदा गुणतालिकेत ३ विजयांसह सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत हैदराबादवर मिळवलेला विजय हा चेन्नईसाठी या हंगामात आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. हैदराबादला या सामन्यात विजयासाठी १६७ धावा हव्या होत्या. परंतू केन विल्यमसनचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.

विल्यमसन मैदानावर असेपर्यंत हैदराबादच्या आशा पल्लवित होत्या. कर्ण शर्माला धोनीने सामन्यातलं १८ वं षटक टाकण्याची संधी दिली. मात्र शर्माने पहिलाच चेंडू आखूड टप्प्याचा टाकत विल्यमसनला चौकार मारण्याची सोपी संधी दिली. यानंतर विल्यमसनला बाद करत शर्माने चांगलं पुनरागमन केलं. मात्र यानंतर हैदराबादच्या तळातल्या फलंदाजांनीही शर्माच्या उर्वरित ४ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षटकार लगावला. यामुळे नाराज झालेल्या धोनीने मैदानातच कर्ण शर्माला कानपिचक्या दिल्या.

सुदैवाने हैदराबादच्या तळातल्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी न देत चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र बऱ्याच कालावधीनंतर चाहत्यांना मैदानात धोनीचं वेगळंच रुप अनुभवायला मिळालं.