किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून विजय मिळवत दिमाखदार पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचं विमान पुन्हा एकदा जमिनीवर आलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर कोलकात्याविरुद्ध सामन्यात १६८ धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला. एका क्षणाला चेन्नई हा सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच KKR च्या गोलंदाजांनी महत्वाच्या षटकांमध्ये विकेट घेत चेन्नईला बॅकफूटवर ढकललं. या सामन्यात KKR चा कर्णधार दिनेश कार्तिकने आजमावलेल्या रणनितीचं चांगलंच कौतुक होतं आहे.

महेंद्रसिंह धोनी विरुद्ध सुनिल नारायण यांच्यातलं द्वंद्व लक्षात घेता दिनेशने सुनिलला उशीरा गोलंदाजीसाठी बोलावलं. आयपीएलमध्ये आतापर्यंत धोनी सुनिल नारायणच्या गोलंदाजीवर एकदाही चौकार किंवा षटकार मारु शकलेला नाही. याआधीच्या सामन्यांमध्येही धोनी नारायणच्या गोलंदाजीवर नेहमी अडखळत खेळला आहे. धोनीच्या या कमजोरीचा फायदा उचलत कार्तिकने नारायणला उशीरा गोलंदाजीसाठी बोलवत चेन्नईच्या धावगतीवर अंकुश लावला. अपेक्षेप्रमाणे धोनी विरुद्ध नारायण या द्वंद्वात पुन्हा एकदा नारायणनेच बाजी मारली. धोनी सुनिलच्या गोलंदाजीवर एकही चौकार किंवा षटकार लगावू शकला नाही.

सामना हातातून निसटत चालला आहे याची जाणीव झाल्यानंतर धोनीने वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर तो माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज अपेक्षित फटकेबाजी करु शकले नाही आणि कोलकात्याने अनपेक्षित पुनरागमन करत सामन्यात बाजी मारली.