इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवूनच जोशात प्रारंभ केला होता, परंतु त्यानंतर चेन्नईच्या कामगिरीचा आलेख खालावतच गेला. शुक्रवारी मुंबईविरुद्धच्या परतीच्या लढतीत झगडणारा चेन्नईचा संघ काही युवा खेळाडूंना अजमावण्याची दाट शक्यता आहे.

साखळीतील उर्वरित चारही सामने जिंकून गुणांची बेरीज १४  करीत बाद फेरीसाठी चेन्नईला आशावादी राहता येईल. फॅफ डय़ू प्लेसिस वगळता चेन्नईच्या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव आढळत आहे. धोनी धावांसाठी झगडताना दिसतो आहे. केदार जाधव विश्वास सार्थ करण्यात अपयशी ठरतो आहे. एन. जगदीशन किंवा ऋतुराज गायकवाडला संधी देण्याची नितांत आवश्यकता आहे.

दुसरीकडे, नऊ सामन्यांपैकी सहा विजय मिळवून खात्यावर १२ गुण जमा असणाऱ्या मुंबईने आणखी दोन गुणांची कमाई केल्यास बाद फेरीतील स्थान जवळपास निश्चित होऊ शकेल. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने सुपर ओव्हरच्या महालढतीत हरवण्यापूर्वी मुंबईने सलग पाच सामने जिंकले होते. मुंबईकडे क्विंटन डीकॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यासारखे धडाके बाज फलंदाज आहेत. याशिवाय हाणामारीच्या षटकांमध्ये फटकेबाजी करू शकणारे किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ासुद्धा आहेत. कठीण प्रसंगी कृणाल पंडय़ा आणि राहुल चहर उपयुक्त ठरतात.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या