मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर दिल्लीच्या संघाने बंगळुरूवर ६ गडी राखून विजय मिळवला. देवदत्त पडीकलच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूने १५२ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांच्या अप्रतिम खेळींच्या जोरावर दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. याशिवाय, पराभूत होऊनही चांगल्या नेट रनरेटमुळे RCBला प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळालं.

मुंबईकर रहाणेचं दमदार अर्धशतक…

शिखर धवनची ‘गब्बर’ खेळी…

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूचा सलामीवीर जोशुआ फिलीप (१२) स्वस्तात बाद झाला. विराटही २४ चेंडूत २९ धावा करून विराट माघारी परतला. त्यानंतर पडीकलने डीव्हिलियर्सच्या साथीने भागीदारी करत डावाला आकार दिला. पडीकलने ४१ चेंडूत ५ षटकारांसह ५० धावा केल्या. डीव्हिलियर्सने फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो २१ चेंडूत २ षटकारांसह ३५ धावा करून बाद झाला. त्यामुळे संघाला १५२ पर्यंतच मजल मारता आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्येने ३, कगिसो रबाडाने २ तर अश्विनने १ बळी टिपला.

पडीकलचं धमाकेदार अर्धशतक…

या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकर पृथ्वी शॉ चांगली खेळी करू शकला नाही. तो २ चौकार लगावत ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी अनुभव पणाला लावत संघाला मजबूत भागीदारी करून दिली. शिखर धवन दमदार अर्धशतक केल्यावर माघारी परतला. त्याने ५४ चेंडूत ६ चौकारांसह ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर मुंबईकर अजिंक्य रहाणेने संयमी खेळी करत हंगामातील पहिलं अर्धशतक लगावलं. त्याने ४६ चेंडूत ६० धावा केल्या. अखेरीस ऋषभ पंत (८) आणि मार्कस स्टॉयनीस (१०) या दोघांनी नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. शहाबाजने २ गडी तर सुंदर, सिराजने १-१ बळी टिपला.