दुबई : गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही विजेतेपदाच्या प्रबळ दावेदाराला साजेसा खेळ करत आहे. त्यामुळे सलग पाच सामने जिंकून बाद फेरीच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या मुंबईचा विजयरथ रोखण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईने गेल्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा आठ गडी राखून धुव्वा उडवला. रोहितचे सातत्य डळमळीत असल्याने सलग दोन लढतींमध्ये सामनावीर ठरलेला क्विंटन डीकॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. दुसरीकडे, ख्रिस गेलच्या पुनरागमनीय सामन्यात पंजाबने बेंगळूरुवर सरशी साधली. गेलव्यतिरिक्त के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल यांच्याकडून त्यांना सर्वाधिक अपेक्षा आहेत.

हैदराबादपुढे आज कोलकाताचे आव्हान

अबू धाबी : ‘आयपीएल’च्या रविवारी दुपारी होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद सलग तिसरा पराभव टाळण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. दोन्ही संघांना अद्यापही सर्वोत्तम ताळमेळ असलेला संघ साधण्यात अपयश येत आहे.

नूतन कर्णधार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाताला गेल्या सामन्यात मुंबईने धूळ चारली. आंद्रे रसेलची सुमार कामगिरी कोलकाताला महागात पडत असून अन्य फलंदाजही खेळ उंचावण्यात अयशस्वी ठरत आहेत. पॅट कमिन्स अष्टपैलू योगदान देत असला तरी सुनील नारायणची त्यांना प्रकर्षांने उणीव जाणवत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करणाऱ्या हैदराबादची सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यावर सर्वाधिक भिस्त आहे.

’ सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.’

’ सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट