इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

गेल्या सामन्यात अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब विजयीपथावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला सलामीवीरांचे अपयश महागात पडत आहे. डावखुऱ्या क्विंटन डीकॉकला तीन सामन्यांत फक्त ४८ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे डीकॉकऐवजी धडाकेबाज ख्रिस लिनला मुंबईच्या संघात स्थान मिळू शकते. बेंगळूरुविरुद्ध ९९ धावा फटकावणारा किशन उत्तम यष्टीरक्षकही असल्याने तो डीकॉकच्या अनुपस्थितीत ही भूमिका बजावू शकतो. मात्र हार्दिक आणि कृणाल या पंडय़ा बंधूंना कामगिरीत सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराला मुंबईसाठी सातत्याने योगदान देणे महत्त्वाचे आहे. बुमराला तीन सामन्यांत तीनच बळी मिळवता आले असून यंदा त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज सहज षटकार लगावताना आढळत आहेत. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन या विदेशी वेगवान जोडीला बुमरावरील भार कमी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. राहुल चहर फिरकीपटूची भूमिका समर्थपणे निभावत आहे.

दुसरीकडे मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरल्यामुळे पंजाबला हातातोंडाशी आलेले सामने गमवावे लागले आहेत. कर्णधार के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल या दोघांनीही यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये शतके झळकावली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या सलामी जोडीवरच पंजाबची भिस्त असेल.

हाणामारीच्या षटकांत गोलंदाजांची सुमार कामगिरी हा पंजाबसाठी चिंतेचा विषय आहे. युवा फिरकीपटू रवी बिश्नोई मात्र मधल्या षटकांत धावा रोखत असल्याने मुंबईच्या फलंदाजांविरुद्ध तो कशी गोलंदाजी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी