आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. सौरभ तिवारीच्या झुंजार खेळीच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. चेन्नईच्या विजयानंतर अनेक दिग्गजांनी ट्विट करत चेन्नईच्या फलंदाजांचं कौतुक केलं आहे. यामध्येच भारताचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या खास शैलीत चेन्नईच्या विजयाचं विश्लेषण केलं आहे.

विरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत सामन्यानंतर ट्विट करत लक्ष वेधलं आहे. इडलीनं पुन्हा एकदा वडापावला हरवलं, असं ट्विट सेहवागने केलं आहे. सेहवागने आपल्या ट्विटमध्ये रायडू आणि फाफ डु प्लेसिस यांच्या फलंदाजीचं तोंडभरुन कौतूक केलं आहे. सेहगावने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की,’आयपीएलची दमदार सुरुवात झाली. रायडू आणि फाफ डु प्लेसिस यांची खेळी दमदार होती. पण सॅम करनने केलेली छोटी पण महत्वाच्या खेळीने सामन्याचे चित्र बदलले. इडलीने पुन्हा एकदा वडा पावचा पराभव केला. #CSKvsMI ‘


असा रंगला सामना-

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली. १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. दोन गडी स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.